सर्वोच्च न्यायालयाने सरला मुद्गल खटल्यात, एका हिंदू पुरुषाने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला व त्यानंतर दुसरा विवाह केला. या तक्रारीच्या संदर्भात हे असे न व्हावे म्हणून शासनाने सर्व जमातींना समान असा विवाहविषयक कायदा करावा अशी सूचना दिली. राज्यघटनेच्या 44 व्या कलमात शासनाने समान नागरी कायदा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शक तत्त्व सांगितले आहे. त्याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ज्या पुरुषाचा दुसरा विवाह (धर्मांतर केल्यानंतरचा) न्यायालयात अवैध ठरवला त्याने त्या निर्णयाविरुद्ध फेरतपासणीसाठी अर्ज केला आहे. धर्म बदलणे हा जर व्यक्तीच्या धर्मविषयक स्वातंत्र्याचा भाग आहे तर धर्म बदलून नवीन धर्माच्या कायद्यांना मान्य असलेल्या दुसऱ्या विवाहास अवैध कसे म्हणता येईल?
आत्मा हवा का?
वासांसि जीर्णानि यथा विहाय…….
हे खूप लहानपणी कानावर आले. माणसाला आत्मा असतो. तो अमर असतो. शरीर मेले तरी तो मरत नाही. पहिली वस्त्रे काढून नवी घालावीत तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. या जन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म कुणाचा येणार ते ठरते. असे ऐकले अगदी पहिल्यापासून.
या सगळ्या कल्पना, खऱ्या असोत वा नसोत, त्यांचे मूळ काय असेल? माणसाला आत्मा असतो असे प्रथम कुणाला तरी का वाटले असेल? मूळ शोधणे तसे जवळपास अशक्यच आहे. पण या ना त्या स्वरूपात माणसाला आत्मा असतो असे जगातले सर्व समाज मानत आले आहेत.
मराठीला वाचवायचे? आणि ते का बरे?
‘मराठी भाषेला वाचवा!’ अशा प्रकारची हाकाटी हल्ली केली जात आहे. या हाकाटीतले आवाहन जसे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय नेतृत्वाला केलेले असते तसेच ते थेट लोकांनाही केलेले असते. त्यापुढे जाऊन, मराठी भाषा कशी वाचवायची याबद्दल लोकजागृती करणे, काही धोरण स्वीकारणे, आणि निरनिराळे नियम बांधणे अशाप्रकारचे कार्यक्रम आखले जातात. मराठी भाषा कशापासून वाचवायची याही प्रश्नाची विविध उत्तरे दिली जातात—इंग्रजीच्या किंवा हिंदीच्या आक्रमणापासून वाचवायची, अरबी-फार्सीच्या प्रभावापासून भाषा शुद्ध करायची, अगदी संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिला वाचवायची अशी काही उत्तरे मिळत असतात. मराठी-भाषकांना कोणत्या न्यूनगंडाने पछाडले आहे याची चिंता केली जाते.
धर्म, धर्मकारण, धर्मनिरपेक्षता इत्यादी
गेल्या पाचपन्नास वर्षांत ह्या देशात अनेक गोष्टींचे वाटोळे करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अर्थात् हे कर्तृत्वही परंपरेतून आले असावे. पिढ्यानपिढ्या आपण हे करीत आलो असलो पाहिजे. नाट्यशास्त्रात एके ठिकाणी जगात अनेक वर्षे (म्हणजे देश) आहेत, पण एकट्या भारतवर्षात दुःख आहे; म्हणून तिथे नाटक करायला हवे; असे म्हटले गेले! त्यावरून आजकाल जे घटते आहे त्यासंबंधी फार आश्चर्य वाटायला नको. पण हा विनोदाचा भाग झाला. तो घटकाभर बाजूला ठेवू. स्थूलमानाने बोलायचे तर इतर फळ्यांप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या फळीवरही आपण अयशस्वी ठरलो आहोत असे म्हणता येईल.
विवेकवादाच्या मर्यादा
[गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे यांनी नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयात ‘भारतीयांचा पुरुषार्थ विचार’ व ‘विवेकवादाच्या मर्यादा’ या दोन विषयांवर दोन व्याख्याने दिली. प्रा. रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्त्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानांचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून व्याख्यानांच्या विषयांवरील त्याचा अधिकार निर्विवाद आहे. त्यांनी केलेले विवेकवाद आणि त्याच्या मर्यादा यांचे विवेचन ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना उद्बोधक वाटेल, म्हणून ते व्याख्यान येथे उद्धृत करीत आहोत. – संपादक]
रॅशनलिझमचे (rationalism) ‘विवेकवाद’ हे भाषांतर आहे अशी कल्पना मी करतो.
हे छोटे सरदार की खोटे सरदार
गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून 27 फेब्रुवारी 2002 च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या देशाने गेल्या पन्नास वर्षांत जेवढे म्हणून मुख्यमंत्री पाहिले त्यांत सर्वोत्तम मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच असल्याचे शिफारसपत्र अडवाणींनी दिले. मोदींनी गुजरातेत यशस्वी केलेला प्रयोग भारतभरच्या गावोगावी आणि खेडोपाडी करू असा दृढसंकल्प तोगडियांनी व्यक्त केला.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?(भाग १)
साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘चारचौघी‘ ह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्ये—विचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे असोत, सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्री-पुरुषाचे सहजीवन होणे हीच आदर्श कुटुंबरचना असली पाहिजे. परंतु केवळ पुरुष जे जे करतो ते ते स्त्रीलाही करता आले पाहिजे ह्या एकाच विचाराच्या आहारी गेल्यामुळे येथे सर्वच प्रश्नांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहिले गेले आहे व ते सुद्धा एकांगी आणि आत्मकेन्द्रित दृष्टिकोणातून.
‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’
[बघण्याच्या पद्धती (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. 1972 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि परंपरा ह्यांनी कसे संस्कारित झालेले असते हे युरोपिअन तैलचित्रांच्या माध्यमातून तपासते. पुस्तकातील सात निबंधांमधून लेखक वाचकाच्या मनात प्रश्न जागे करू इच्छितात.
‘ल्यूटाइन बेल’
लॉइड्ज् ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्यावसायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात.
लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई. आपापले संभाव्य खर्च तपासा, अशी ती सूचना असे.
अध्यात्म आणि विज्ञान
लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. ‘अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. ‘म्हणजे ती दोन आहेत की काय? आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टींची दोन नावे आहेत.’ आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे.