भारताला ब्रिटिश साम्राज्यातून मुक्ती मिळाल्यावर, संविधान तयार होत असतानाच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्यांनी लोकशाही संदर्भात काय कल्पना केली असेल? ब्रिटिश वसाहतवादी शोषणातून आणि त्याचबरोबर पूर्वीच्या राजेशाही व्यवस्थेतूनसुद्धा मुक्ती मिळाल्याचा आनंद त्यांना झाला असणार. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या नीतितत्त्वांवर समाजरचना होईल; सामान्य लोकांकडेसुद्धा स्वशासनाची काही सूत्रे सोपविली जातील; किंबहुना स्वराज्य निर्माण होईल अशी स्वप्नेसुद्धा काहींनी पाहिली असणार. थोडे सिंहावलोकन केले तर प्रत्यक्षात मात्र गेल्या सात दशकांत लोकशाहीची वाटचाल ह्याच्या विपरीत दिशेने झाली आहे असे लक्षात येते.
सध्याच्या लोकशाही प्रक्रियेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे करणार्यांना ढोबळमानाने एक उत्तर दिले जाते, ते असे की तुमची लोकतंत्राच्या संदर्भात काही तक्रार असेल तर मतदानाचे तुमचे कर्तव्य बजावून तुम्ही बदल घडवून आणा; हा तुमचा हक्क आहे.