कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१०मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.
जानेवारी २०१०मधील विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून हैतीला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेची नेपाळी स्वयंसेवकांची तुकडी. त्यांच्या कॅम्पमधून जमा होणारा मैला जवळच्याच आर्टीबोनाइट नदीत सोडला जाई. नेपाळमध्ये कॉलरा एंडेमिक म्हणजेच त्या भागात वर्षानुवर्षे टिकून राहिलेला आजार आहे.