बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य काय असू शकते याचा विचार करताना आपल्याला चार गोष्टींचा विचार करावा लागतो: बुद्धी, प्रामाण्य, आस्तिक्य; आणि या तीनही गोष्टींना पायाभूत असणारी चौथी संकल्पना, म्हणजे ज्ञान.
यांपैकी आस्तिक्य आपण तात्पुरते बाजूला ठेवू आणि उरलेल्या तीन गोष्टींचा प्रथमतः अगदी थोडक्यात परामर्श घेऊ. या तीन संकल्पनांचा परामर्श घेणारे शास्त्र म्हणजे ज्ञानशास्त्र किंवा प्रमाणशास्त्र. याचा भारतीय दर्शनांच्या चौकटीत विचार करायचा झाल्यास इंद्रियांद्वारे आणि मानसप्रक्रियेने आपल्याला जे काही ‘समजते’ ते सर्व ज्ञान. आता यात ‘इंद्रिये’१ आणि ‘समजणे’ हासुद्धा मानसप्रक्रियेचाच भाग झाला.
*१. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, स्वाद, गंध यांचा अनुभव देणारी पाच ज्ञानेंद्रिये.