जानेवारी २०२० पासून जगभर कोव्हिड-१९ महासाथीने मानवसंहार चालवला आहे. याच कालावधीत दक्षिण अमेरिकेतील असंतोष ते इस्राएल- पॅलेस्टिनिअन युद्ध आणि अमेरिकन संसदेवरील जीवघेणा हल्ला ते भारतातील कुंभमेळा व निवडणुकांचे मेळे इत्यादी जागतिक मानवनिर्मित संकटे पाहून मलासुद्धा इतर लोकांप्रमाणे प्रश्न पडला आहे की मानवजातीच्या भविष्यात नशिबाने काय वाढून ठेवले आहे?
खरंच, नशीब नशीब म्हणतात ही काय चीज आहे?
मानवकृत आणि निसर्गकृत नशीब
माणूस दोन पायांवर उभा राहायला लागल्यापासून त्याने जे जे कर्म केले त्याचा विपाक म्हणजे मानवनिर्मित नशीब. “मॅग्निफिसंट ऑब्सेशन” या कादंबरीचे लेखक लॉईड डग्लस आपल्या आत्मवृत्तात म्हणतात की, “मानवी इतिहास ही एक अखंड चाललेली मिरवणूक आहे.