आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे.
बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारक समाजापुढे मांडत आले होते. तरीसुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी हेरली. त्याचबरोबर पौराणिक वर्णन – पद्धतीचा चतुराईने वापर करून आश्रमहरिणत पोथीचा आभास त्यांनी निर्माण केला.