आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे.
अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे तादात्म्य प्राप्त करणे, व अशा रीतीने मोक्ष मिळविणे. या ध्येयाला मुक्ती प्राप्त करणे, निर्वाणाप्रत जाणे, साक्षात्कार होऊन परमेश्वराची प्राप्ती होणे, अशा विविध प्रकारे व्यक्त करण्यात येते.