व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर चर्चा केल्यास बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, reason, श्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादी सर्व विषयांचा ऊहापोह होऊन जाईल.
सृष्टीतील अचेतन आणि सचेतन अशा सर्व वस्तूंना निश्चित गुणधर्म असतात. अचेतन वस्तूंमध्ये स्वतःच्या अंगचे चैतन्य नसते तर सचेतन वस्तूंमध्ये (वनस्पती आणि प्राणी) अंगभूत चैतन्य असते.