अध्यात्म आणि विज्ञान यांचे परस्परांशी संबंध काय आहेत ? या प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत. एक उत्तर आहे : ती मूलतःच परस्परविरुद्ध आहेत; दुसरे उत्तर आहेः ती स्वतंत्र आहेत, आणि म्हणून त्यांच्यात कसलाही संबंध नाही; आणि तिसरे आहेः ती स्वतंत्र आहेत, पण ती परस्परपूरक आहेत. या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते ? पण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे पाहिले पाहिजे.
अध्यात्म आणि विज्ञान यांपैकी विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर बरेच निश्चित आहे, आणि म्हणून ते देणे सोपे आहे.