……गृहस्थाश्रम हीच स्वाभाविक स्थिति होय. प्राचीनकाळी बहुधा सर्व मनुष्यांना या स्थितीचा अनुभव घ्यावयाला मिळे. पण अर्वाचीन काळी भिन्न परिस्थितीमुळे पुष्कळ स्त्रीपुरुषांना अविवाहित स्थितीत आयुष्य कंठणे भाग पडत आहे व यापुढे ही संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. ही स्थिति नाहींशी करण्यासाठी निदान तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय शोधून काढणे हा फार गहन प्रश्न आहे व त्याशी झगडण्याला तेजस्वी पुरुष पाहिजेत. पण मनुष्याला त्याच्या स्वाभाविक स्थितीचा उपयोग घेऊ न देणारी कृत्रिम बंधनें जर समाजांत उत्पन्न झाली असतील, तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपली शिकस्त करणे हे सामान्य मनुष्याचे देखील कर्तव्य आहे.
पत्रव्यवहार
संपादक , आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
भारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.
साहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी.
इंग्रजी माध्यमाचा हव्यास
आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन आवश्यक असल्याची भाषा गेले एक शतक आपण केलेली आहे. या पद्धतीत स्वतंत्र भारतात… नजरेत भरणारा एक बदल पालकांनी घडवून आणला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या व त्यांच्याकडे ‘देणग्या’ देऊनही प्रवेश मिळविण्यासाठी वाहणारा पालकांचा लोंढा. तथापि धनिक व वरिष्ठ वर्गाची मुले तेथे मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या हातातच पुढे समाजातील सर्व क्षेत्रांमधली सत्ताकेंद्रे जात असल्याने त्या शाळांना एक आगळी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या नावाला दिपून आता औद्योगिक मजूरही आपली मुले त्या महागड्या शाळांत पाठवताना दिसू लागले आहेत.
पत्रव्यवहार
प्रा. दि.य. देशपांडे यांस, स.न.
आपले दि. ३ मार्चचे पत्र पोचले. त्यापूर्वीच एक आठवडा आजचा सुधारकच्या जास्तीच्या प्रती मिळाल्या होत्या व मी त्या काही निवडक मंडळींना माझ्या पत्रासह पाठविल्याही होत्या. सोबत त्या पत्राची प्रत आपणास माहितीसाठी पाठवीत आहे. त्यांपैकी दोघांचा (नरेन तांबे व ललिता गंडभीर) वर्गणी पाठवीत असल्याबद्दल फोन आला. (एकाचे ‘माझा आजकाल अशा लेखनाचा समाजावर काही परिणाम होऊ शकतो यावरचा विश्वास उडाला आहे’ असेही नकारात्मक पत्र आले.) आणखीही काही जणांकडून वार्षिक वर्गणी निश्चितच येईल असे वाटते. मध्यंतरी काही कामामुळे ‘बृहन्महाराष्ट्रवृत्तासाठी अर्धवट लिहून ठेवलेला मजकूर पूर्ण करून पाठविणे जमले नाही, ते या महिन्यात पूर्ण करीन.
पुस्तक परिचय: अमेरिका: अवचटांना दिसलेली
अमेरिका
ले. अनिल अवचट मॅजेस्टिक प्रकाशन, ऑगस्ट ९२ मूल्य ६५ रु.
कॉलेजात शिकत असताना मनाला अमेरिकेची ओढ वाटायची. खरं तर मुळात इंग्लंड, इटाली, ग्रीस हे कुतूहलाचे विपय असत. ‘नेपल्स पाहावे मग मरावे’ असे भूगोलाच्या पुस्तकात पढलो होतो. ‘Rome was not built in a day अशा म्हणी, सीझर, सिसेरो, अँटनी-क्लिओपाट्रा यांचे इतिहास या साऱ्यांमुळे इटाली, व्हेनिस, पिरॅमिड्स यांच्याबद्दल जबर आकर्षण वाटे. अमेरिकेला चारशे वर्षांमागे इतिहास नाही. पण कॉलेजात राजा म्हणायचा, ‘प्रभू, इतिहास सोड. वर्तमानात ये. आज अमेरिका नंबर वन आहे. कधी ऐपत आलीच तर अमेरिका पाहा.
प्रीतिवाद
मुख्य विषयाला हात घालण्याआधी विवेकवादातील एका मुद्द्याला हात घालतो. त्याची संगती नंतरच्या युक्तिवादात आहे. तेव्हा थोडे विषयांतर.
व्याख्यात्मक विधाने
व्याख्यात्मक विधाने ही स्वतःहून सत्य किंवा असत्य असत नाहीत. उदाहरणार्थ : “भ्र म्हणजे एक यंत्र की जे दूध व पाणी (मिसळलेले) दूर करते.” या व्याख्यारूपी विधानास स्वतःची अशी सत्यता नाही. या विधानावरून एकच बोध होतो की यापुढे मी ‘भ्र’ चा उल्लेख केला तर काय समजावे. ज्याप्रमाणे एखाद्या निर्धारास सत्यता वा असत्यता पोचत नाही त्याप्रमाणे या व्याख्यांनाही ती (सत्यता वा असत्यता) चिकटू शकत नाही.
अध्यात्म आणि विज्ञान (उत्तरार्ध)
जापान कोवा
आपल्या भोवतालचे विश्व मानवाला अनुकूल आहे, एवढेच नव्हे तर सबंध विश्वच मानवाच्या स्वरूपाचे म्हणजे जड नसून चैतन्यमय आहे, असे ठरविण्याकरिता भारतीय आणि पाश्चात्त्य अध्यात्मात अनेक युक्तिवाद केले गेले आहेत. त्यांपैकी एक प्रसिद्ध युक्तिवाद म्हणजे इंद्रियगोचर जग भ्रामक आहे असे सिद्ध करणारा युक्तिवाद. इंद्रियगोचर जग सत् नाही. कारण ते सतत बदलणारे, परिवर्तमान आहे, आणि सत् तर अपरिवर्तनीय, त्रिकालाबाधित असते असा हा युक्तिवाद आहे. परंतु या युक्तिवादात वापरली गेलेली प्रमुख प्रतिज्ञा (premise), म्हणजे सत् त्रिकालाबाधित असते ही कशावरून खरी मानायची ?
धारणात् ‘धर्मः’?
आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या धारणात् धर्मः।’ अशी केलेली असून त्याबद्दल कोणतीही शंका उरू नये म्हणून लगेच धर्मो धारयते प्रजाः । असेही विधान केलेले आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा असा संकल्प उच्चारण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी प्रजांना म्हणा किंवा प्राणिमात्राला धारण करणारा धर्म अस्तित्वात होता आणि तो केवळ माणसांमध्येच नसून कृमिकीटकांपासून तो पशुपक्ष्यांतही होता. मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची मोहळे, दिगंत संचार करणारे पाखरांचे थवे, लांडगे, हरणे, वानरे ह्यांचे कळप ह्यांच्या जीवनासंबंधी ज्यांना थोडेसेतरी ज्ञान आहे त्यांना त्यांची समाजव्यवस्था कशी बांधीव असते ते सांगण्याची गरज नाही. ह्या मनुष्येतर योनी सोडून मानवाच्या आदिमतम समूहाकडे पाहिले तरी काही ना काही समाजव्यवस्था तेथे आढळतेच.
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ – प्रा. देशपांडे यांना उत्तर
धर्म म्हणजे रिलिजन नव्हे; धर्माचे मुख्य स्वरूप समाजधारणेचे म्हणजे ऐहिक स्वरूपाचे आहे ह्या माझ्या विधानाच्या समर्थनार्थ माझ्या लेखात मी धर्मशास्त्राचे गाढे व्यासंगी व विद्वन्मान्य लेखक भारतरत्न म. म. डॉ. पां. वा. काणे यांनी केलेली धर्माची व्याख्या उद्धृत केली होती. (आजचा सुधारक, फेब्रु. १९९३). परंतु प्रा. देशपांडे यांना ती विचारात घेण्यासारखी वाटली नाही. त्यावर त्यांची टीका अशी की डॉ. काणे यांनी केलेली व्याख्या काहीही असली तरी धर्मशास्त्रावरील आपल्या ग्रंथात धर्माचा आधार वेद आहे असे त्यांनी म्हटले आहे व त्यात उपनयन, चार आश्रम, विवाह, दैनिक पंचमहायज्ञ, चाळीस संस्कार ह्यासारख्या विषयांचाच ऊहापोह केला आहे.
कल्पनारम्यवाद व राजकारण (Romanticism and Politics)
पाश्चात्त्य साहित्यामध्ये अनेक वर्षांपासून कल्पनारम्यवाद (Romanticism) व अभिजातवाद (Classicism) असे दोन वाङ्मयीन ‘वाद’ किंवा विचारप्रवाह प्रचलित आहेत. ह्या दोन ‘वादांना अनुसरून कल्पनारम्य साहित्य किंवा अभिजात साहित्य (विशेषतः काव्य) लिहिले गेले आहे व हे दोन प्रकारचे साहित्य परस्परांपासून अगदी भिन्न मानले गेले आहे. साधारणतः १६ व्या शतकापासून (शेक्सपिअरचा काळ) ते १९ व्या शतकापर्यंत हे साहित्यिक वाद पाश्चात्य साहित्यात (विशेषतः इंग्रजी साहित्यात) प्रामुख्याने अग्रेसर होते. तरी पण १६६० ते १७४० व १७९० ते १८४० ह्या कालखंडामध्ये हे वाद विशेष हिरिरीने पुढे आले. पहिल्या कालखंडाल (१६६०-१७४०) ‘नव अभिजात वाद युग (New-Classical Age) असे नाव इंग्रजी साहित्याच्या इतिहासात दिले आहे व दुसऱ्या कालखंडात (१७९० ते १८४०) ‘कल्पनारम्य युग (Romantic Age) असे नाव दिले आहे.