२०२२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून AI च्या चर्चा रंगल्यात. चॅटजीपीटीमुळे सर्वांचे लक्ष जणू या एका बिंदूपाशी येऊन थांबले आणि आपण सर्वांनी कळत नकळत या कृत्रिमप्रज्ञेला डेट करायला सुरुवात केली आणि आता साधारण ७-८ महिन्यांनी हे नाते या टप्प्यावर आले आहे की ‘लिव्-इन’मध्ये राहून पाहूयात जरा.
कारण कृत्रिमप्रज्ञा हा आपल्या आयुष्यातला होऊ घातलेला नवीन जोडीदार आहे यात शंका नाही. पण संसार थाटायच्या आधी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे.
तर २०२२ च्या किती आधीपासून आपण कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान वापरत आहोत? मग ते गूगलने पुरवलेले नकाशे असूदेत नाहीतर ऑनलाइन चॅट-बॉट्स असूदेत किंवा टायपिंग करताना स्वतःहून दुरुस्त होऊन येणारे शब्द असूदेत.