उद्देशपत्रिकेतील एक अंश पश्चात्बुद्धी
युरोपातील सामाजिक आणि सांस्कृतिक संचित आणि ऐतिहासिक घडामोडी ह्यांच्यामधून सेक्युलॅरिझम ह्या संज्ञेने तेथे जसा आपला अर्थ उचलला तसाच भारतातही, त्याच कारणांनी ह्या संज्ञेला स्वतःचा एक खास स्वदेशी स्वाद लाभला आहे. असा की जो कोणत्याही व्याख्येत मावूच नये. घटनेच्या शब्दसंहितेच्या चौकटीत बंदिस्त होताना ती कल्पना आपले चापल्य गमावून बसली असती. कधी कधी शब्द असे नेमकेपणा नसलेले, निराकार असल्यागत मोकळे सोडणे बरे असते. त्यांच्यातला लवचीकपणा अनुभवांनी, स्थळा-काळाच्या संदर्भांनी आपोआप आकार घेऊ लागते. ‘सेक्युलर’ हा शब्द बेचाळिसाव्या दुरुस्तीद्वारा घटनेच्या उद्देशपत्रिकेत प्रविष्ट होऊन ना तिची संकल्पनात्मक अस्मिता (Conceptual Concept) वाढली, की कमी झाली!