कृत्रिम आणि नैसर्गिक
कृत्रिमप्रज्ञा (Artificial Intelligence: AI) म्हणजे काय हे सांगणे हे सोपे नाही. येथे सुरुवातीलाच कृत्रिम आणि नैसर्गिक या शब्दांचे द्वंद्व आहे. सोपे करून सांगायचे झाल्यास कृत्रिम म्हणजे मनुष्यप्राण्याच्या इच्छेनुसार (free will, स्वेच्छेनुसार) बनलेले आणि या बनवण्याच्या प्रक्रियेत जीवशास्त्रीय प्रक्रियांचा समावेश नसलेले असे काहीतरी. नैसर्गिक प्रक्रियांमध्ये आपण स्वेच्छा किंवा हेतू नसलेल्या सर्व भौतिक प्रक्रियांचा आणि त्याचबरोबर जैविक प्रक्रियांचा, विशेषतः गर्भधारणा आणि प्रजोत्पादन प्रक्रियांचा, समावेश करू. उद्या मानवाने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून महाबुद्धिमान प्राण्यांची नवीन जात बनवली तर त्यांच्या प्रज्ञेला आपण कृत्रिम म्हणण्याचे कारण असणार नाही.