नास्तिक्य आणि राजकारणी
साथींनो जिंदाबाद.
आज या नास्तिक परिषदेत ‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या विषयावर आपण बोलतो आहोत. नास्तिकतेचा माझा अनुभव मी सांगते. जवळपास सहा महिन्यांपासून परिषदेच्या निमित्ताने मी लोकांमध्ये जात होते. “आम्ही नास्तिक परिषद घेणार आहोत. तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. आणि आम्हाला फंडचीही गरज आहे.” असे सातत्याने जेव्हा मी लोकांपुढे मांडत होते तेव्हा लोकांमधून प्रश्न आला, “मॅडम तुम्ही? नास्तिक? तुम्ही तर नगरसेविका!” साधारण सगळ्यांनाच वाटते की नास्तिक्य आणि राजकारण हे अगदी वेगळे विषय आहेत. राजकारणी हा नास्तिक मंचावर असूच शकत नाही.