माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नीक-एकपतिक पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बरेचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.
यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक?