विश्वनिर्मिती, ईश्वर संकल्पना, विवेकवाद
विज्ञानाच्या मदतीने मानवाने अतिशय थोड्या कालावधीत विश्वनिर्मितीचा कूटप्रश्न सोडविण्याच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे.जागतिक तापमानवाढ व वाढती शस्त्रास्त्रस्पर्धा यांतून मानवजात अजून 500 वर्षे तग धरून राहिली तर ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या खूप जवळ आपण पोहचू शकू. पण हे कोडे त्याला पूर्णपणे उलगडले तरी ईश्वर ह्या संकल्पनेला फारसा धक्का बसणार नाही. ती संकल्पना व विवेकवाद ह्यांत अंतर्विरोध निर्माण होऊ न देणे हे विवेकवादी व्यक्तींसमोरील महत्त्वाचे आह्वान आहे.
“जर आपल्याला सृष्टीचा स्वयंपूर्ण सिद्धान्त शोधता आला तर, कालांतराने तो फक्त काही निवडक शास्त्रज्ञच नव्हे तर तत्त्वज्ञ आणि सर्वसामान्य माणसांनाही विश्वाच्या व मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीबद्दल मार्गदर्शक ठरेल.