दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याची सर्वंकष व्याख्या कोणती? दारिद्र्य नैसर्गिक आहे की कृत्रिम? दारिद्र्याची निर्मिती कशी होते, दारिद्र्याचा निर्माता कोण? दारिद्र्य स्वनिर्मित असते की पर-निर्मित? असे मूलभूत प्रश्न विचारणारी व्यक्ती ‘मानवतेची शत्रू’ या दूषणाने संबोधित केली जाते. एकांगी विचारवादाने ग्रसित तथाकथित मानवतावादी असे प्रश्न विचरणार्या व्यक्तीला फाडून टाकायलाही कमी करणार नाहीत. असे असले तरी मी मात्र ‘असे प्रश्न’ विचारण्याचे धाडस करीत आहे.
पुष्कळदा दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करताना नशीब, नियती, पूर्वजन्मीचे पाप अशी अवैज्ञानिक पद्धतीची छद्म व फसवी कारणमीमांसा पुढे केली जाते व त्यानुसार दारिद्र्यनिर्मूलनाची प्रक्रिया ही ‘भूतदया’, ‘माणुसकी’, ‘सहानुभूती’ यांसारख्या दयासृजित भावनेने व पद्धतीने राबविण्यात येते.