एक राजकीय आदर्श
‘सार्वभौमता’ ह्या संकल्पनेसारखी ‘सेक्युलॅरिझम’ची एक संकल्पना म्हणून ओळख सहज पटते पण तिची व्याख्या दुष्कर आहे. समाजशास्त्राच्या व राज्यशास्त्राच्या पंडितांत बौद्धिक व्यवहारात ह्या संज्ञेचा सर्रास प्रयोग होत असला तरी ह्या संकल्पनेतला नेमका व्यवच्छेदक अंश कोणता ह्याबद्दल मतभेद आहेत. भिन्न काळी भिन्न देशांत ‘सेक्युलर’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’ ह्या संज्ञा समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक आशयांनी परिप्लुत झालेल्या आहेत.
“अतीन्द्रिय आणि साक्षात्कारमूलक पूर्वगृहीतांचे ज्यांमधून निर्मूलन केलेले आहे असा स्वयंशासित ज्ञानप्रदेश म्हणजे सेक्युलॅरिझम” अशी व्याख्या करण्यात आली आहे. सामाजिक शास्त्रांच्या (Encyeclopaedia of Social Sciences) ज्ञानकोशातून घेतलेली ही व्याख्यासुद्धा वर्जनात्मक (restrictive) आहे.