गीतेतील नीतिशास्त्र
तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका आक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच, अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म-किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे?’