गेल्या अनेक दशकांपासून काही मेंदूवैज्ञानिक आणि बौद्धधर्मीय अभ्यासकांनी बौद्धवादाचा आणि मेंदूविज्ञानाचा संबंध जोडला आहे. मला मात्र खाजगीरीत्या हा संबंध मंजूर नव्हता आणि तो मी नाकारत आलेलो आहे. अशा प्रकारे विज्ञानाशी संबंध जोडण्याचा प्रकार इतर अनेक धर्मांबाबतही होत आलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या बाबतीतही खोलात जाऊन वैज्ञानिकरीत्या तपासणी केल्यास त्यातला फोलपणा उघड होईल याची मला खात्री वाटत होती.
‘जेव्हा धार्मिक तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक शोधाद्वारे पाठिंबा मिळतो तेव्हा त्या धर्मातील अनेकजण असा दावा करतात की पहा, आमचा अनुभव हा सत्यपरिस्थितीवर आधारलेला आहे. पण वैज्ञानिक पुरावा जर त्यांच्या पूर्वग्रहित धार्मिक मतांच्या कितीही विरोधी आला तर तो अशा धार्मिक लोकांना पटत नाही.