आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शेतीसारख्या मूलभूत क्षेत्रामध्येही तंत्रज्ञानाचे योगदान काही नवीन नाही. कुदळ आणि नांगर यांपासून पिढ्यान्पिढ्या शेतीला सुलभ आणि लाभदायक करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
गेल्या शतकात रासायनिक खते, अनुवंशशास्त्र वापरून तयार केलेले बी-बियाणे, ठिबक सिंचन इत्यादी तंत्रज्ञान शेतीतून मिळणारे उत्पन्न व पिकाचा कस वाढवण्यासाठी वापरले गेले. औद्योगिक प्रमाणावर शेती होऊ लागली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी विशिष्ट पिकांची मागणी वाढत होती. त्यामुळे त्या पिकांचा दरही वाढत होता. तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक आणि पुरवठा साखळीत झालेल्या प्रगतीमुळे विशिष्ट प्रदेशातील पिकांची मागणी जगभरात होऊ लागली.