विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील षट्दर्शनांच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नाही, हे तू गेल्या खेपेत सिद्ध केलंस. परंतु फलज्योतिष हे भविष्याचा वेध घेतं, त्यामुळे आपण ते ‘अनुमान’ ह्या ज्ञानाच्या दुसऱ्या स्रोताच्या कसोटीवर तपासून बघायला नको का?”
“खरं सांगू का, ‘प्रत्यक्षप्रमाण’ ह्या भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनांच्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कसोटीवर जी गोष्ट निव्वळ ‘भ्रम’ आहे हे सिद्ध झाले आहे, त्याविषयी आणखीन काही चर्चा करणे निरर्थक आहे.