विवेकानंद, हिंदूधर्म, इस्लाम
—————————————————————————
माझ्या प्रिय मित्रा,
मला तुम्ही पाठवलेले पत्र अतिशय भावले आणि आपल्या मातृभूमीसाठी ईश्वर शांतपणे किती अद्भुत गोष्टी रचतो आहे हे कळल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. आपण त्याला वेदान्त म्हणा किंवा अन्य कोणतेही नाव द्या, पण सत्य हे आहे की धर्म आणि चिंतनाच्या क्षेत्रातील अखेरचा शब्द आणि ज्या स्थानावरून आपणास सर्व धर्म व पंथांचे प्रेमाने अवलोकन करता येईल त्याचे नाव आहे अद्वैतवाद. मला विश्वास आहे की भविष्यातील प्रबुद्ध मानवतेचा धर्म हाच असेल. हिब्रू आणि अरबांच्या पूर्वीचा वंश असल्यामुळे हिंदूंना ह्या मुक्कामावर इतरांपूर्वी पोहचण्याचे श्रेय घेता येऊ शकेल; परंतु वास्तवातील अद्वैतवाद, जो सर्व मानवजातीला स्वतःच्या आत्म्याप्रमाणे बघतो व तसा आचारही करतो, सर्व हिंदूंमध्ये कधीही प्रस्थापित झाला नाही.