आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या ग्रामीण कादंबरीवर प्रदर्शित झालेला चित्रपट, तमाशा कलावंतांच्या जीवनाची शोकांतिका मांडतो. तमाशाकडे आजही टाकाऊ कला म्हणून पाहिले जाते. त्यात काम करणारे कलावंत उपेक्षित राहतात. त्यांची भटकंती चालूच असते. या कला व कलावंतांकडे बघण्याची दृष्टी बदलावी, असा संदेश हा चित्रपट देतो.
बाळू मांगाच्या पोटी जन्मलेला गुणा हा तमाशाच्या वेडाने झपाटलेला आहे. तमाशात राजा होऊन झकास वग लावावा, आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करावे, हे त्याचे स्वप्न असते. परंतु त्याला नाच्या व्हावे लागते. नाच्या म्हणून त्याला लोकांनी स्वीकारल्यानंतर ते त्याला अर्जुनाच्या भूमिकेत स्वीकारत नाहीत.