मे महिन्यातली सकाळ! कडक उन्हाळा! सकाळचे नऊ-साडेनऊ वाजलेले! काल संध्याकाळी गावाशेजारच्या मोठ्या गावात मोर्चा निघालेला होता, व शेवटी मोर्चा सरकारी धान्याच्या गोडाउनवर गेला. नंतर पोलिसांच्या लाऊडस्पीकरवरून कडक सूचना. शेवटी मोर्चेकऱ्यांनी न ऐकल्याने लाठीमार, अश्रुधूर व गोळीबाराचे आदेश. सात-आठ लोकांचा गोळ्या लागल्याने जागेवरच मृत्यू व अनेक जखमी. बाकीचे हौशे-नवशे आपापल्या गावांकडे पळाले.
अर्थातच रात्री व रात्रभर याची चर्चा गावागावांत चालू होती. पोलिसांच्या समोर सरकारी गोडाऊन फोडण्याच्या घटनेमुळे लोकांना एकप्रकारचा आत्मविश्वास आलेला होता. आपल्याला हवी असलेली वस्तू सरकारी मालकीची व सरकारी बंदोबस्तात असली तरी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो!