डॉ. वसंत गोवारीकरांच्या ‘एक्स्प्लोअरिंग इंडियाज पॉप्युलेशन सिनॅरिओ’ ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती जानेवारी ९२ मध्ये प्रकाशित झाली. सुधारित दुसरी आवृत्ती जुलै ९३ मध्ये प्रकाशित झाली. डॉ. गोवारीकर महाराष्ट्राच्या चांगल्या परिचयाचे आहेत. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख, भारत सरकारचे विज्ञान-तंत्रज्ञान सचिव (१९८६-९१), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. मौसमी पावसाची प्रक्रिया आणि हवामानाचे दूरदृष्टीचे भाकित वर्तवण्याबाबत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे.
विज्ञान, लोकसंख्या आणि विकास याबद्दलच्या त्यांच्या पुस्तकावर लोक-संख्यातज्ञांची प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाची होती. राष्ट्रसंघाने त्यांना त्यांची मते तपशिलात मांडायला सांगितली, ज्यातून ‘द इनेव्हिटेबल बिलियन प्लस’ हा ग्रंथ घडला.