‘आधुनिक’ या सदैव कालसुसंगत/कालनिरपेक्ष (?) असलेल्या संकल्पनेची सर्वंकष आणि निर्विवाद अशी सर्वमान्य व्याख्या अजूनही प्रलंबितच आहे. आणि त्यामुळे आधुनिक, उत्तराधुनिक, उत्तरोत्तराधुनिक, + + + × × × ….. असे फसवे व भ्रामक तथा अर्थदुष्ट(!) शब्दप्रयोग करून/वापरून ‘आधुनिक’ या निसर्गतःच स्वतंत्र व स्वायत्त संकल्पनेची ऐशीतैशी करण्यात आजची प्रचलित विचारशैली मश्गुल असल्याचे पदोपदी व सदैव आढळून येते.
अशा या सांकल्पनिक उपपत्तींच्या सम्यक व समग्रग्राही आकलनाअभावी अतिसौम्य/शिथिलरित्या वापरल्या जाणाऱ्या प्रतिगामी व पुरोगामी या विचारपद्धतीसुद्धा आपापल्या रंगीबेरंगी वर्तुळात हळूहळू अतिरेकी रूप धारण करू लागतात. विचारपद्धती प्रतिगामी असो वा पुरोगामी ती अतिरेकी झाली की तिचे पर्यावसान शक्तिशाली नकारात्मक/विनाशात्मक परिणामाला कारणीभूत ठरण्यातच होते, हे सर्वविदित आहे.