आजचा सुधारक ऑगस्ट १९९४ च्या अंकात मी एका प्रक्षोभक विषयाला हात घातला होता.
त्यात स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीला मानाने वागविणे, तिच्या विवेकशक्तीचा आदर करणे, तिच्या कोणत्याही (यामध्ये योनिविषयक वर्तनही आले) वर्तनामधील औचित्यानौचित्याविषयी तिला स्वतन्त्रपणे निर्णय करता येतो असा विश्वास तिच्या स्वतःच्या व इतरांच्या ठिकाणी निर्माण करणे ह्या गोष्टींचा मी ओझरता उल्लेख केला होता. आज त्याचा थोडा विस्तार करावयाचा आहे.
स्त्रीमुक्तीविषयी आमच्या सगळ्यांच्या मनांत पुष्कळ गैरसमज आहेत. माझा मागचा लेख वाचून झाल्यावर मला पुष्कळ लोक भेटले. पत्रे फार थोडी आली. त्यांपैकी एका पत्राचा काही अंश मी पुढे उद्धृत करणार आहे.