मी ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, तार्किक, आर्थिक आणि तद्विषयक संयुक्तिक/साधार दृष्टिकोनातून कट्टर विदर्भवादी असून तद्विषयक तथ्यात्मक वस्तुस्थितीचे पुनरावलोकन करून उद्विग्न होत असतो. विदर्भ राज्यविषयक संदर्भ असलेला १९५३ च्या नागपूर कराराचा आणि संविधानातील अनुच्छेद ३७१(२) मधील तरतुदींचा महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी केलेला विश्वासघात तद्जनित बट्ट्याबोळासह संख्याशास्त्रीय संख्यात्मक आकडेवारी देऊन थकल्यावरही राज्यकर्त्यांच्याच नव्हे तर आम्हां तथाकथित वैदर्भियांच्याही कानावर अजूनही जूं रेंगू शकलेली नाही ही कटू वस्तुस्थिती आहे.
१९६० नंतरच्या गेल्या सुमारे ६२ वर्षांत सर्वाधिक कालावधीसाठी विदर्भाकडेच मुख्यमंत्रीपद राहूनही मुंबई नावाच्या मेनका, रंभा, उर्वशी यांनी आपल्या विश्वामित्रीकरणाच्या जाळ्यातून आमच्या वैदर्भीय मुख्यमंत्र्यांचीही सुटका होऊ दिली नाही.