वामन मल्हारांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी झाला, आणि सुमारे ६१ वर्षाचे कृतार्थ जीवन जगून २० जुलै १९४३ या दिवशी मुंबईला त्यांचा अंत झाला. या घटनेलाही जवळ जवळ अर्धशतक लोटले आहे. वामनरावांची साहित्यातील कामगिरी तशी मोलाचीच. परंतु तत्त्वचिकित्सा – विशेषतः नैतिक तत्त्वज्ञान आणि एकूणच चौफेर तत्त्वविवेचन करणारे ते मराठीतले पहिले आधुनिक लेखक आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या जीवनाचा पुढील संक्षिप्त आलेख नव्या पिढीतील सामान्य वाचकांना उपयुक्त होईल असे वाटते.
वामन मल्हार तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९०६ साली एम.ए. झाले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेले असता त्यांची प्रोफेसर विजापूरकरांशी गाठ पडली.