गेल्या दहा वर्षांत दलित-बहुजन कलावंतांच्या आगमनाने अनेक चित्रपट, टीव्ही आणि वेबसिरीज आणि माहितीपटांनी बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि विचार टिपण्यास सुरुवात केली आहे. या सांस्कृतिक उलथापालथीची नितांत गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा देशाच्या राजकीय पटलावर आले, तेव्हा भारतातील लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाला ‘अस्पृश्य’ म्हणून संबोधले गेले आणि त्यांना धोकादायक आणि अपमानास्पद व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. मूलभूत मानवी हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. या सामाजिक कुप्रथांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आंबेडकरांनी राष्ट्रवादी नेतृत्वावर ठेवला. जातिनिहाय वर्गवारी आणि विषमता न सुटल्यास ब्रिटिश साम्राज्यवादापासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याला काहीच किंमत राहणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता.