एस. पी. देशपांडे
लेखांचे विषय जरी त्या-त्या विशेषज्ञांनी निवडले असले आणि जगदीशचंद्र बसूंच्या मुखपृष्ठावरील उताऱ्यावरून एकच सर्वसमावेशक विज्ञान असले तरी त्याच्या विविध उपांगांचा ह्या अंकात समावेश करण्याची घेतलेली खबरदारी स्पृहणीय आहे. ज्यांना पानपूरके म्हणतात ती किंवा ज्यांना अवतरणे किंवा चौकटी म्हटले आहे त्या, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि संशोधकांच्या विज्ञानविषयक निबंधांतून उद्बोधक विचार डोळसपणे निवडून मधून मधून अंकात पेरल्याने ह्या अंकाच्या गुणवत्तेला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.
एका अत्यंत महत्त्वाच्या विज्ञानशाखेची गैरहजेरी तीव्रतेने जाणवते, ती म्हणजे रसायनशास्त्र शाखेची. मानवी जीवनावर प्राचीन काळापासून परिणाम करणारा व त्याच्या साहाय्याने विज्ञानाच्या शाखोपशाखात भर टाकणारा, विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा औषधशास्त्रात रसायनशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व असताना, अशी महत्त्वाची शाखा कशी सुटली?