१८ जुलैच्या साधनेत श्री नानासाहेब गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या उत्तरार्धात नानासाहेबांनी गांधीवादी पर्यावरणवाद्यांवर परखड टीका केली आहे. तिला श्री वसंत पळशीकरांनी २९ ऑगस्टच्या साधनेत उत्तर दिले आहे. त्या उत्तरावरील ही प्रतिक्रिया.
ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथमतः भौतिक, निर्जीव पदार्थांचा आणि शक्तींचा, आणि नंतर वनस्पती आणि प्राणी यांचा, त्यांच्या जीवनव्यवहारांचा बनलेला आहे. यांपैकी भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन, निर्जीव अशा शक्तींचा आणि त्यांच्या घडामोडींचा वनलेला आहे; परंतु निसर्गाचा जो भाग वनस्पती आणि प्राणी यांचा बनलेला आहे त्यात जीव, संज्ञा, हेतुपुरस्पर कृती या गोष्टी आढळून येतात.