श्री. मा. श्री. रिसबूड यांना उत्तर
स.न.
आपले दि. १५-७ चे पत्र आणि आपले पुस्तक ‘फलज्योतिष’ दोन्ही मिळाली. त्याबद्दल आभारी आहे.
आधी आपल्या पत्राला उत्तर देतो, मग आपल्या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये’ या परिशिष्टाविषयी लिहितो.
प्रथम विवेकवाद्याच्या तोंडी आपण जो युक्तिवाद घातला आहे त्यात थोडी दुरुस्ती सुचवितो. आपण म्हणता की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ति हा आजच्या घटकेला तरी दुर्भेद्य स्तर आहे.’ यावर माझे म्हणणे पुढीलप्रमाणे आहे असे आपण म्हणता. ‘त्या दुर्भेद्य स्तरापर्यंत जायचेच कशाला? थोडे आधीच थांबावे, म्हणजे सृष्टीला आदिकारण नसून हे सर्व आपोआप चालले आहे असे मानावे.’