इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।
(गीता अ. ३ श्लोक. ४२)
गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे. मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही. संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही. संस्कृत-मराठी “गीर्वाणलघुकोशा”त मेंदू हा शब्द नाही. पुढे शोध घेता लक्षात आले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद, उपनिषदे, गीता यांत नाही. एवढेच नव्हे तर तो बायबलात नाही, कुराणात नाही, कुठल्याही धर्मग्रंथात नाही.
विषय «तत्त्वज्ञान»
शेवटचा स्टॉप नाही!
“म्हणजे एकंदरीतच वेदान्त हा मानवी कल्याणाचा विचार दिसतो. तिथे ‘हिंदू’ ‘इस्लाम’ या लेबलांना स्थान नाही. हे पाहता सतत मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो, ‘संघपरिवाराला विवेकानंद एवढे जवळचे कसे काय वाटतात व डाव्या पुरोगामी मंडळींना ते निदान कालपर्यंत तरी जवळपास पूर्णत: अस्पृश्य होते हे कसे काय?’
‘हे बघ मित्रा, समाजातील उच्च स्थान, प्रभाव व कर्तृत्व यांनी फार मोठ्या असलेल्या व एरवी अत्यंत आदर वाटावा अशा अनेक व्यक्ती विचारांच्या उदारतेच्या प्रांतात त्या त्या परिस्थितीच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत असे दुर्दैवाने घडताना अनेकदा दिसते खरे.
जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त
जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता नाही. मनु हे नाव कोणी मानवांचा आदिपुरुष कल्पून त्याला दिले आहे असे जाणवते. मानवाचा आदिपुरुष कोण? मनु. म्हणून मनूचे ते मानव. मनुस्मृति ह्या ग्रंथात त्या काळात प्रचलित असलेल्या समजुतींचा संग्रह आहे, असे म्हणायला पुष्कळ वाव आहे.
अनश्व-रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व – लेखांक पहिला
नव्या केन्द्र सरकारचे शंभर दिवस उलटून गेले आहेत. ह्या शंभर दिवसांत कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारी कचेऱ्या, बाजार कोठेही परिवर्तनाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नवे सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढे चालवील अशी चिह्ने दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे पंतप्रधान आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ते ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते.
बौद्धवाद आणि मेंदू
गेल्या अनेक दशकांपासून काही मेंदूवैज्ञानिक आणि बौद्धधर्मीय अभ्यासकांनी बौद्धवादाचा आणि मेंदूविज्ञानाचा संबंध जोडला आहे. मला मात्र खाजगीरीत्या हा संबंध मंजूर नव्हता आणि तो मी नाकारत आलेलो आहे. अशा प्रकारे विज्ञानाशी संबंध जोडण्याचा प्रकार इतर अनेक धर्मांबाबतही होत आलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या बाबतीतही खोलात जाऊन वैज्ञानिकरीत्या तपासणी केल्यास त्यातला फोलपणा उघड होईल याची मला खात्री वाटत होती.
‘जेव्हा धार्मिक तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक शोधाद्वारे पाठिंबा मिळतो तेव्हा त्या धर्मातील अनेकजण असा दावा करतात की पहा, आमचा अनुभव हा सत्यपरिस्थितीवर आधारलेला आहे. पण वैज्ञानिक पुरावा जर त्यांच्या पूर्वग्रहित धार्मिक मतांच्या कितीही विरोधी आला तर तो अशा धार्मिक लोकांना पटत नाही.
धर्मसुधारणा – विचाराचा एक अंतर्गत प्रवाह
श्रद्धा आणि परंपरा हीच धर्माची बलस्थाने असतात असे मानले जाते. त्यामुळे धर्म आणि धार्मिक आचार यांच्यात सुधारणा संभवत नाही, असे गृहीत धरले जाते. जो धर्म एकाच धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही, त्या हिंदुधर्मात थोडी लवचिकता होती; परंतु पारतंत्र्याच्या काळात ती नष्ट होऊन रूढींना कवटाळून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
ह्यावर मात करून धर्मचिकित्सा करण्याचे प्रयत्न दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. धार्मिक परंपरा न मानणाऱ्यांनी व त्या न पाळणाऱ्यांनी धर्मसुधारणेचा विचार मांडला तर तो लोकांना पटणे अवघड असते. वाईसारख्या क्षेत्री धर्मशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या एका ज्ञाननिष्ठ तपस्व्याने धर्मसुधारणेचा एक क्रांतिकारक प्रयत्न केला.
मार्क्सवाद आणि संस्कृती
मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सर्जनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सर्जनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही आहे. नंतरच्या मार्क्सवादयांनी मात्र या दोन पैलूंकडे दुर्लक्ष केले. म्हणून युरोपातला मार्क्सवाद जडवादासारखा झाला. मुळात मार्क्सचे तत्त्वज्ञान माणसातील चैतन्यालाच आवाहन करते. यातून हे स्पष्ट होते, की मार्क्सवाद किंवा शास्त्रीय समाजवाद हा मानुषकेंद्री अध्यात्माशी सुसंगत आहे.
अनवरत भंडळ (६)
आध्यात्मिक साधनाः सुंदर जगण्यासाठी योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्मांडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विशातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवाद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळ्यांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळ्या/अज्ञानी प्रकृतीच्या/निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत/चाचपडत झाल्यासारखा दिसतो कारण बाह्यतः हा जड/अचेतन ऊर्जेचा/पदार्थाचाच प्रवास आहे. आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे.
इतिहासजमा ?
(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार)
सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची चळवळ
विवेकवादाच्या चळवळीत शासन आणि न्यायव्यवस्था ह्यांचा काय सहभाग असतो, समाजसुधारक आणि सामाजिक संस्था ह्यांना काय तडजोडी करायला लागतात आणि विरोधकांची त्यामध्ये काय भूमिका असते असा सर्व अंगाने अंनिसच्या कायदाविषयक चळवळीचा अभ्यास केला तर ते उद्बोधक ठरेल.
अंनिस १९९० पासून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. ह्यात शासनाची चालढकल अशी राहिली. एका राजवटीत १९९५ मध्ये कायद्याचे अशासकीय विधेयक विधानपरिषदेत प्रचंड बहुमताने मंजूर झाले परंतु कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. नंतर दुसरी राजवट आली. त्यांनी १५ ऑगस्ट २००३ ला ‘जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ अशी जाहिरात करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.