मिलिंद बोकील ह्यांनी २००३ साली ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना.
डॉ. जयंतराव पाटील यांनी विनोबांच्या या लेखसंग्रहाचे संकलन करून प्रस्तावना लिहिण्याचे काम मला जेव्हा सांगितले तेव्हा आयुष्यात पूर्वी कधीही नाही इतका प्रचंड संकोच वाटला. मन अतिशय दडपल्यासारखे झाले. संकलन करण्याचे काम अवघड नव्हते, पण प्रस्तावना लिहिणे? त्या कामाला आपण पात्र नाही एवढे आत्मज्ञान मला जरूर होते. अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर विनोबांसारख्या महात्म्याच्या लेखांची ओळख माझ्यासारख्याने करून देणे म्हणजे सूर्याला काजव्याने ओवाळण्यासारखे होय. पण डॉ. पाटील यांनी सांगितले की सध्याच्या पिढीतील एका माणसाला विनोबांबद्दल काय वाटते ते कळण्यासाठी हे काम तू करायला हवेस.