सजीव येई जन्मासी। अटळ असे मृत्यू त्यासी।
जाणीव प्रत्येक व्यक्तीसी। जी का असते सज्ञानी ॥१॥
अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन ।
निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥
सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ ।
सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥
व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्या-गाई-गुरे ।
मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥
पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण ।
परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप तो सातवा ॥५॥
यांसी म्हणितले चिरंजीव । कल्पना केवळ मानीव ।
त्या त्या काळी सजीव । ते असतील सातही ॥६॥
परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत ।
कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥
देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार ।
स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥
तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व ।
मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥
मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे ।
मरणासंबंधीचा शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥
मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण ।
तिरडी-गोवर्या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥
दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे ।
शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥
भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे ।
कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥
घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती ।
तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ॥१४॥
बुद्धिवंतासी ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय ।
मरणी भयदायक काय । घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥
वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक ।
जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजांनी ॥१६॥
यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक ।
प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥
म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय ।
परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥
प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण ।
जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥
टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन ।
जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥
द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन ।
नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥
अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह ।
जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥
यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार ।
नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥
आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना ।
आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥
आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे ।
परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥
शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे ।
तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥
विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे।
जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥
संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने ।
नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥
यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना । सातत्याने जनमना–।
वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥
असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे ।
शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥
आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म ।
त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥
आपण प्रयत्न करावे । गतजन्मीचे काही आठवावे ।
तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥
याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देती लोक ।
पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥
गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही ।
पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ?
विषय «कविता»
कुंभारवाडा
काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे
भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्यात
मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प,
न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला
दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्या थेंबांतून निघताना
घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे
आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं
प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून
कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी
चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत
तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच्या झाडाआड,
आणि छचोर तोता मैनेच्या पिंजर्यावर सावलीचं जाळं पडतं
लाजेचं काजळ थोबाडावर पसरून मग सूर्यच काळाठिक्कर पडतो
आणि युगायुगांची रात्र निर्लज्जपणे फैलावत राहाते.
“विचारां”चा विचार
(प्रा. दि.य.देशपांडे यांच्या विवेकवादास…)
कधी आला आहे का तुझ्या मनात असा विचार,
विचार…की करू यात आता विचारांचा संचार, विचारांचा विचार!
जेव्हा वास्तवतेचा आधार देतोस तू डावलून, तेव्हा उरतात ते फक्त अनिर्बंध, निराधार तर्क
अन मग त्यातून येतात जन्माला पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, स्वर्ग आणि नरक!
का ठेवतोस तू अशा संकल्पनांवर विश्वास ज्याला नाही काही पाया,
अन दुर्देवाला कोणत्या आधारावर म्हणतोस तू “भूत का साया”?
जर करत बसलास तू मागचा-पुढचा जन्म, पाप अन पुण्य,
तर या निराधार विचारात करून घेशील हे मिळालेले जीवनही नगण्य!
मला दंड द्या!
देशावर, समाजावर अशी घोर आपत्ती व पतन पाहून –
या कठिण संकटकाळातून सुटकेसाठी –
पुनः पुन्हा व आवश्यक चिंतन–मननानंतर-
मला एखादा विचार मार्ग पटला आहे.
पण
अशा विचारमार्गावर आचरणासाठी
माझे हातपाय गळत असतील
आणि
अशा विचारांनुसार जीवन जगण्यासाठी
मी प्रगतीशील व प्रयत्नशील नसेल;
तर
हे माझ्या देशा, माझ्या समाजा –
मला दंड द्या.
माझ्या नाकर्तेपणाचा धिक्कार करा भर चौकात.
हे मला जगवणाऱ्या माती;
माझ्या फुफ्फुसात भरलेली हवा;
माझे सिंचन करणारे जल;
ह्या कठिण काळातही
जगण्याच्या माझ्या तटस्थतेवर थुंका.
हे माझ्या मुक्त आकाशा, माझ्या विनम्र झाडांनो,
आणि धडधडून पेटलेल्या अग्नीशिखांनो;
माझ्या सोई-सुविधालोलूप दिशाहीनतेसाठी
मला दंड द्या.
चार फुले
हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे
एक छोटंसं मूल आहे
हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे.
चार फुलं फुलली आहे.
इशारा हा की अजून आनंद आहे
आणि माठात भरलेले पाणी पिण्यायोग्य आहे.
हवेत श्वास घेतला जाऊ शकतो अजूनही
आणि इशारा हा की जगही आहे
उरलेल्या जगात मीही आहे उरलेला.
हा इशाराच की मी अजून उरलो आहे
एखाद्या संभवनीय युद्धातून जिवंत वाचून,
मी आपल्या इच्छेनुसार मरू इच्छितो,
आणि मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
अनंतकाळ जगण्याची कामना करतो.
कारण अजून चार फुलं आहेत आणि जग आहे.
‘कर्मसिद्धान्त पंचक’
एक सुखी एक दुःखी।
एक गाडीत एक पायी।
दुराचारी मौज करी।
सदाचारी दुःख करी॥१॥
कुणी महाली एक।
कुणी एक झोपडीत॥
कुणी एक दिगंबर।
कुण्या दुजास पीतांबर।।२।।
एकास ते भोजन।
एकासन जेवण।
सर्व करा सहन।
कर्म अपुले म्हणून ।।३।।
तत्त्वज्ञान असले।
माणुसकी विसरले॥
कर्मफल समजले।
देवावर सोडले।।४।।
धिक्कार दैववादाचा।
विसर माणुसकीचा॥
माणुसकी एक धर्म।
बाकी सारे अधर्म ।।५।।
१०३, धनश्री बिल्डिंग, स्वरनगरी, आनंदनगर,
सिंहगड रोड, पुणे-५१ दूरध्वनी: ०२०-२४३५४६८५
नका देऊ मला इतक्या दूर बाबा
बाबा, नका देऊ मला इतक्या दूर
जिथं मला भेटायला यायला
तुम्हाला घरातील बकऱ्या विकाव्या लागतील.
नका करू माझं लग्न त्या देशात
जिथं माणसापेक्षा जास्त
ईश्वरच राहतात.
नसतील जंगल नदी डोंगर
तिथं नका करू माझी सोयरीक
जिथल्या रस्त्यांवरून
मनापेक्षाही जास्त वेगाने धावतात मोटारी,
आहेत जिथं उंच उंच घरं आणि
मोठ मोठी दुकानंच नुसती
त्या घराशी नका जोडू माझं नातं
जिथं मोठं मोकळं अंगण नाही
कोंबड्याच्या आरवण्यानं होत नाही
जिथली सकाळ अन् संध्याकाळी मावळणारा सूर्य दिसत नाही.
नका निवडू असा वर
जो पारावर अन् गुत्त्यात असेल कुंबलेला
सतत कामचुकार, ऐदी
जो चतुर असेल जत्रेत पोरी फिरविण्यात
असा वर नका निवडू माझ्यासाठी.