विषय «उवाच»

ही खरेदीविक्रीची पद्धत किती दिवस चालणार?

लग्न ही सर्वसामान्य प्रत्यही घडणारी गोष्ट आहे. मग ही खरेदीविक्रीची पद्धत अजून का नाही बंद पडत? विशेषतः शाळा कॉलेजांतून जाणाऱ्या मुलींना ‘पाहण्याची’ काय आवश्यकता आहे? आम्ही पडदानशीन थोड्याच आहोत? शाळेत जाता-येता मुलगी अव्यंग आहे की नाही हे सहज अजमावता येईल. घरी येऊन तरी चहापोहे झोडून मुलीला चारदोन मामुली प्रश्न विचारण्यापलीकडे वरपक्ष काय करतो? मुलीचे शील व स्वभाव एका दृष्टिक्षेपात ओळखण्याची कुवत वरपक्ष झाल्याने अंगात येते थोडीच! मग वधूपरीक्षेचा अर्थ तरी काय? पाहून मुलगी केल्यावरही ‘तिला अंधारात उभी केली होती’, ‘ती जरा पाठमोरी बसली होती’ वगैरेसारखी क्षुल्लक कारणे सांगून मुलीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न नाही का लोक करीत!

पुढे वाचा

विवाह संस्था आणि स्त्री

प्रश्न : विवाहसंस्था नष्ट झाली तर मुलांचा प्रश्न निर्माण होईलही; पण स्त्रियांचा तरी विकास होईल का ?

गीता साने: हो, विवाहसंस्था नष्ट झाली तर स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या कमी होतील आणि विकास होईल. आज बायकांना हे करावसं वाटतं, ते करावस वाटतं, पण जमत नाही. उर्मी एकदा निघून गेली की गेली! हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्यासारख्या बाईचं सुद्धा मुलं लहान असताना हेच झालं. पण मुलींची जबाबदारी समाजावर व्यवस्थितपणे सोपवून मगच विवाहसंस्था नष्ट करता येईल. दुसरं असं की, बाईला कुणा पुरुषाचं आकर्षण वाटलं की आज समाज तिला धारेवर धरतो.

पुढे वाचा

कृत्रिम बंधनांच्या प्रतिकारासाठी शिकस्त करा

……गृहस्थाश्रम हीच स्वाभाविक स्थिति होय. प्राचीनकाळी बहुधा सर्व मनुष्यांना या स्थितीचा अनुभव घ्यावयाला मिळे. पण अर्वाचीन काळी भिन्न परिस्थितीमुळे पुष्कळ स्त्रीपुरुषांना अविवाहित स्थितीत आयुष्य कंठणे भाग पडत आहे व यापुढे ही संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. ही स्थिति नाहींशी करण्यासाठी निदान तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय शोधून काढणे हा फार गहन प्रश्न आहे व त्याशी झगडण्याला तेजस्वी पुरुष पाहिजेत. पण मनुष्याला त्याच्या स्वाभाविक स्थितीचा उपयोग घेऊ न देणारी कृत्रिम बंधनें जर समाजांत उत्पन्न झाली असतील, तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपली शिकस्त करणे हे सामान्य मनुष्याचे देखील कर्तव्य आहे.

पुढे वाचा

इंग्रजी माध्यमाचा हव्यास

आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन आवश्यक असल्याची भाषा गेले एक शतक आपण केलेली आहे. या पद्धतीत स्वतंत्र भारतात… नजरेत भरणारा एक बदल पालकांनी घडवून आणला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या व त्यांच्याकडे ‘देणग्या’ देऊनही प्रवेश मिळविण्यासाठी वाहणारा पालकांचा लोंढा. तथापि धनिक व वरिष्ठ वर्गाची मुले तेथे मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या हातातच पुढे समाजातील सर्व क्षेत्रांमधली सत्ताकेंद्रे जात असल्याने त्या शाळांना एक आगळी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या नावाला दिपून आता औद्योगिक मजूरही आपली मुले त्या महागड्या शाळांत पाठवताना दिसू लागले आहेत.

पुढे वाचा

धारणात् ‘धर्मः’?

आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या धारणात् धर्मः।’ अशी केलेली असून त्याबद्दल कोणतीही शंका उरू नये म्हणून लगेच धर्मो धारयते प्रजाः । असेही विधान केलेले आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा असा संकल्प उच्चारण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी प्रजांना म्हणा किंवा प्राणिमात्राला धारण करणारा धर्म अस्तित्वात होता आणि तो केवळ माणसांमध्येच नसून कृमिकीटकांपासून तो पशुपक्ष्यांतही होता. मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची मोहळे, दिगंत संचार करणारे पाखरांचे थवे, लांडगे, हरणे, वानरे ह्यांचे कळप ह्यांच्या जीवनासंबंधी ज्यांना थोडेसेतरी ज्ञान आहे त्यांना त्यांची समाजव्यवस्था कशी बांधीव असते ते सांगण्याची गरज नाही. ह्या मनुष्येतर योनी सोडून मानवाच्या आदिमतम समूहाकडे पाहिले तरी काही ना काही समाजव्यवस्था तेथे आढळतेच.

पुढे वाचा

अपत्यांनी मातापितरांचे कृतज्ञ राहावे?

पुष्कळ अविचारी आईबापे आपणास प्रतिपाल न करण्याइतकी संताने अस्तित्वात आणतात आणि उपजल्यापासून मरे तोपर्यंत त्यांचे जीवित शुद्ध दुःखभार करून ठेवतात ……अशा आईवापांच्या अंतःकरणात खरे अपत्यवात्सल्य असते तर त्यांनी असली संतती जगात आणलीच नसती. कित्येक लोक असे म्हणतात की मुले होणे ही काही कोणाच्या हातची गोष्ट नाही. नसेल बापडी! पण आम्हांस येवढे ठाऊक आहे की जरी प्रत्येक लग्न अपत्यावह होतेच असे नाही, तरी लग्नावाचून, म्हणजे स्त्रीपुरुषांच्या संयोगावाचून अपत्योत्पत्ती होते असे नाही. पावसाप्रमाणे मुले आकाशातून पडत असती….तर आईबापांचे निःसीम आणि निर्व्याज प्रेम आणि त्याबद्दल मुलांची कृतज्ञता यांचे खरे महत्त्व कोणाच्याही मनात बरोबर उतरले असते.

पुढे वाचा

आपण काय करावे?

आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि जगाकडे ताठ मानेने पाहिले पाहिजे. जगातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, त्यातील सौंदर्य आणि कुरूपता- या सर्व जशा आहेत तशा निर्भयपणे आपण स्वीकारल्या पाहिजेत. जग बुद्धीने जिंकायचे आहे, त्यातील भयप्रद गोष्टींनी गुलामांप्रमाणे पराभूत होऊन नव्हे. परमेश्वराची सबंध कल्पना पूर्वेकडील सर्वशक्तिमान हुकूमशहांच्या अनुभवातून निर्माण झालेली असून ती स्वतंत्र मनुष्याला मुळीच शोभणारी नाही. जेव्हा माणसे चर्चमध्ये स्वतःला दीन पापी म्हणून लोळण घेतात, तेव्हा ते तिरस्करणीय, स्वाभिमानी मनुष्याला न शोभणारे असते. आपण ताठ उभे राहून जगाकडे निर्भयपणे पाहू या, जगाचा पुरेपूर उपयोग करू या; आणि ते जर आपल्याला कुठे उणे वाटले तर ती उणीव दूर करू या.

पुढे वाचा

ऐहिक सुख

आपण ज्या जगात जन्मलो, त्याची स्थिती सर्वांना शक्य तितकी सुखदायक व्हावी, अशीच खटपट सर्वांनी केली पाहिजे, व त्यांत ऐहिक सुखाचा विचार झाला पाहिजे, ही बुद्धिवाद्यांची भूमिका आहे. आज हिंदुस्थानाला आध्यात्मिक आढ्यतेने ग्रासले आहे. आम्ही सर्व जगाला धडे देऊ ही भूमिका केवळ घमेंडीची आहे, तींत बिलकुल तथ्य नाही. जेथे आम्हांलाच काही येत नाही, तेथे आम्ही लोकांना काय शिकवणार?शास्त्रीय ज्ञानांत आघाडी मारली तरच लोकांना काही शिकवता येईल, एरवी नाही. अध्यात्म हा कल्पनेचा खेळ आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग बिलकुल नाही. प्रजोत्पत्तीच्या बाबतीत सर्व जगाने संयुक्त धोरण आंखणे जरूर आहे, त्यात आपल्यापुरताच विचार कोणीही करता नये.

पुढे वाचा

कामवासना आणि नीती

जेथे जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध येतो तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात, व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते, यामुळे याबाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. अर्थात एवढ्याच दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की दोन व्यक्तींची जर संमती असेल, व एकापासून दुसर्‍यास कोणत्याही रोगाचा नकळत संसर्ग होण्याचा संभव नसेल, तर त्यांच्या समागमास हरकत नाही. नकळत म्हणण्याचे कारण कित्येक वेळा दुसर्‍यापासून संसर्गाचा संभव आहे हे माहीत असताही लोक समागमास उद्युक्त होतात, परंतु ते आपले स्वतःचे नुकसान करून घेतात व यात कोणावरही अनीतीचा आरोप करता येणार नाही.

पुढे वाचा

सत्यप्राप्तीचे उपाय

आपल्या मतांपैकी एकही पूर्णपणे सत्य नसते. प्रत्येकाभोवती संदिग्धता आणि भ्रांती यांचे वलय असते. आपल्या मतांतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय सुविदित आहेत. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या पूर्वग्रहांविरुद्ध पूर्वग्रह असलेल्या लोकांशी चर्चा करणे, आणि जो उपन्यास (hypothesis) अपर्याप्त सिद्ध होईल त्याचा त्याग करण्याची तयारी ठेवण्याची मनोवृत्ती अंगी बाणवणे – हे ते उपाय होत. या उपायांचा अवलंब विज्ञानात करतात, आणि त्यांच्याच साहाय्याने वैज्ञानिक ज्ञानाची भव्य इमारत उभारली गेली आहे. खरी वैज्ञानिक वृत्ती असलेला प्रत्येक वैज्ञानिक हे कबूल करायला तयार असतो की जे वर्तमान क्षणी विज्ञान म्हणून आपण स्वीकारतो त्यात अधिक शोध लागल्यावर बदल करावा लागणार आहे.

पुढे वाचा