तोडफोड, दमबाजी, घोषणाबाजी याच्यापलीकडे जाऊन स्थानिकांच्या हिताचे विवेकी राजकारण करणाऱ्यांची या राज्यात गरज आहे. परंतु भावनिक हिंदोळ्यावर बसून स्वतःचे झोके आभाळात घेऊन जायचे आणि तेथून हात उंचावून भक्तांना दर्शन द्यायचे, याच पद्धतीने अस्मितेचे राजकारण सुरू आहे. राज्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिण्ट’ राज्यावर आल्यानंतर बनविता येत नाही, ती ‘ब्ल्यू प्रिण्ट’ दाखवून राज्यावर यावे लागते. परंतु सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही राजकारण केवळ ‘प्रिण्ट’च्या दिशेने जाणारे आहे. “प्रिण्ट’चा शुद्ध मराठी अर्थ ‘छापणे’ असा होतो आणि ‘छापणे’चा अर्थ काय होतो हे मराठी माणसाला वेगळे सांगण्याची गरज नाही.
विषय «उवाच»
बौद्धिकदृष्ट्या तृप्त
डार्विनने मला बौद्धिकदृष्ट्या तृप्त नास्तिक (intellectually fulfilled atheist) होऊ दिले. – रिचर्ड डॉकिन्स (ब्लाइंड वॉचमेकर, १९९६) नैसर्गिक निवडीतून उत्क्रांतीचे डार्विनचे तत्त्व हे आपल्या अस्तित्वाचे एकुलते एक व्यवहार्य स्पष्टीकरण आहे. फार कशाला, विश्वात जेथे कोठे जीव भेटेल, तेथेही हेच तत्त्व लागू पडेल. सजीवसृष्टीच्या आश्चर्यकारक विविधतेचे, प्राणी, वनस्पती, बुरश्या व बॅक्टीरियांचे ते एकुलते एक ज्ञात स्पष्टीकरण आहे.- रिचर्ड डॉकिन्स (जॉन मेनॉर्ड स्मिथच्या द थिअरी ऑफ इव्होल्यूशन, २००० च्या प्रस्तावनेतून)
दुष्टाव्याचे मूळ
दोन देशांमधील सशस्त्र संघर्षाकडे आपण भीतीने, घृणेने पाहतो. पण आर्थिक संघर्ष युद्धांपेक्षा कमी भीतिदायक किंवा घृणास्पद नसतात. युद्ध हे शल्यक्रियेसारखे असते, तर आर्थिक संघर्ष प्रदीर्घ छळासारखे असतात. त्यांचे दुष्परिणाम युद्धांबद्दलच्या साहित्यातील वर्णनांइतकेच भयंकर असतात. आपण आर्थिक संघर्षांना महत्त्व देत नाही, कारण आपल्याला त्यांच्या घातक परिणामांची सवय असते. युद्धविरोधी चळवळी योग्यच आहेत. मी त्यांना सुयश चिंततो. पण मला एक सुप्त, कुरतडणारी धास्ती वाटत राहाते, की ती चळवळ विफल होईल, कारण ती मानवी हाव, हव्यास, या दुष्टाव्याच्या मुळांना स्पर्श करणार नाही. [नॉन-व्हायलन्स ङ्कवद ग्रेटेस्ट फोर्स या महात्मा गांधींच्या पुस्तकातील हा उतारा नाओमी क्लाईन (द शॉक डॉक्ट्रिन, पेंग्विन, २००७) उद्धृत करते.]
पर्यायांचा ‘निष्फळ’ शोध
जर भांडवलवादाला व्यवहार्य पर्याय असता, तर आजचे संकट जास्त गंभीर होणे शक्य होते. असे म्हणता येईल, की १९३०-४० मधील स्थिती यामुळेच महामंदी ठरली. सोविएत यूनियन तेव्हा अ-भांडवलवादी पद्धतीने औद्योगिकीकरण करत होती, राज्य-समाजवादी अर्थव्यवस्थेने. भांडवलवादी औद्योगिक देशांत सबळ समाजवादी चळवळी होत्या, आणि त्या व्यवस्थाबदल करू पाहत होत्या. १९८० तील राज्य-समाजवादी व्यवस्थांच्या पतनाने आणि समाजवादी चळवळी क्षीण होण्याने ते पर्याय आज शिल्लक नाहीत.
जगभरात भांडवलवादच प्रभावी असल्याने त्या व्यवस्थेला पर्याय शोधणे निष्फळ आहे. पर्यावरणी आपत्ती वगळता कोणतेही अंतिम संकट’ दृष्टिपथात किंवा कल्पनेतही नाही.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे अमेरिकन काळ्या लोकांना काय महत्त्व ?
अमेरिकन गुलामांना तुमच्या चार जुलैचे काय महत्त्व? हा दिवस घोर अन्याय व क्रूरतेची त्यांना आठवण करून देणारा आहे. त्याच्यासाठी तुमचा उत्सव-समारंभ सर्व ढोंग आहे. त्याला तुमचा स्वातंत्र्याचा गर्व, राष्ट्रीयत्वाची थोरवी, तुमचा हर्षोल्हासाने भरलेला आवाज हे सर्व हृदयशून्य आणि पोकळ वाटते. तुमचा स्वातंत्र्य आणि समतेबद्दलचा नारा, तुमच्या धर्मग्रंथातील वचने व ईश्वराचे आभार मानणे हे सर्व त्याला केवळ पोकळ गर्जना, बनवेगिरी, कपट, पूज्यभावाचा अभाव व दांभिकपणाचे लक्षण वाटते. केलेल्या गुन्ह्यावर पांघरूण घालणे, हे असंस्कृत, राष्ट्राला काळिमा लावणारे कृत्य आहे.
फ्रेडरिक डग्लस, पूर्वीचा गुलाम, १८५२ [अमेरिकेतील गोया लोकांना ४ जुलै १७७६ ला स्वातंत्र्य मिळाले, परंतु गुलामगिरी नष्ट व्हायला १८६२ साल उजाडावे लागले.]
बनावट ग्रंथांच्या संबंधाने मानसिक दास झालेले शुद्रादि-अतिशुद्र
बनावट ग्रंथांच्या संबंधाने मानसिक दास झालेले शुद्रादि-अतिशुद्र
…. आम्हांस सांगण्यास मोठे दुःख वाटते की, अद्यापि आमचे दयाळू (इंग्रज) सरकारचे शुद्रादि-अतिशुद्रास विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळे ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचे त्राण राहिले नाही. भट लोक त्या सर्वांस एकंदर सर्व प्रापंचिक सरकारी कामांत किती तुटून खातात याजकडेस आमचे सरकारचे मुळीच लक्ष्य पोचलें नाही, तर त्यांनी दयाळू होऊन भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें.
महात्मा फुले – १८७३ संदर्भः १) Dalits : Law As Paper Tiger!
सार्वजनिक सत्य
ज्योतिबा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्य’ नावाचा सुंदर विचार सांगितला आहे. देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते, गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही.
अराजक म्हणजे काय?
ऐतिहासिक दृष्टीने पाहता अराजकवाद (Anarchism) ही सध्याच्या समाजव्यवस्थेवर टीका करणारी, तिला ‘हवासा’ पर्याय सुचवणारी आणि इथपासून तिथपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी विचारप्रणाली आहे. अविचारी बंडे अराजकवादी नसतात. आजच्या ऐहिक शासनाला तात्त्विक किंवा धार्मिक भूमिकेतून नाकारणेही अराजकवादी नाही. गूढवादी व स्टोइक (mystics & stoics) यांना अराजक नको असते तर इतर कोणते तरी राज्य हवे असते. अराजकवाद मात्र इतिहासात नेहेमीच केवळ माणूस आणि समाज या संबंधांवर रोखलेला आहे. त्याचा हेतू नेहेमीच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा असतो. तो नेहेमीच सध्याच्या सामाजिक रचनेला दुष्ट मानतो. हे मानणे माणसांच्या स्वभावाच्या व्यक्तिवादी आकलनातूनही येत असेल, पण अराजकवादाच्या पद्धती मात्र नेहेमीच सामाजिक बंडखोरी करण्याच्या असतात, मग त्या हिंसेचा आधार घेवोत वा न घेवोत.
आधार मिळतो
ज्या जगात आरोग्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मोठा निरोगी समाज आहे तिथे वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज क्वचितच आणि माफक प्रमाणात भासते. निरोगी माणसे ती, जी निरोगी घरात राहतात, पौष्टिक आहार घेतात आणि त्यांचा परिसर जन्म, वाढ, रोगमुक्ती आणि मृत्यू ह्या सर्वांसाठी अनुकूल असतो. ज्या संस्कृतीमुळे ह्या निरोगी समाजाला आधार मिळतो त्या संस्कृतीने लोकसंख्येच्या मर्यादांचा, वार्धक्याचा, अपुऱ्या रोगमुक्तीचा आणि सतत निकट येणाऱ्या मृत्यूचा जाणीवपूर्वक स्वीकार केलेला असतो. निरोगी माणसांना संभोग, अपत्यजन्म, मानवी जीवनातील विविध अवस्थांमधला सहभाग आणि मृत्यू ह्याकरिता नोकरशाहीच्या हस्तक्षेपाची गरज कमीत कमी असते.
नगरे आणि आर्थिक विकास
आर्थिक दृष्टीने बघता छोट्या भौगोलिक परिसरात मोठी लोकसंख्या एकवटण्याची प्रक्रिया ही सर्व समाजाकराता फायदेशीर असते. नागरीकरणाची प्रक्रिया आर्थिक कारणांमुळेच घडत असते हे उघड आहे. या प्रक्रियेमुळे संपत्ती निर्माण झाली नसती तर ही प्रक्रिया कधीच वाढली नसती. जेव्हा लोकांची दाटी वाढते तेव्हा उत्पादनही वाढते. या दाटीवाटीमुळे काही लोकांच्या अंगभूत वैशिष्ट्यांना प्रगट व्हायची संधी मिळते. ज्या माणसांकडे काही विशेष कसब असते त्याचा वापर करून त्यांना त्यात प्रावीण्यही मिळवता येते. माणसांच्या आकांक्षापूर्तीसाठी मोठा परिसर उपलब्ध होतो, आणि अशाच ठिकाणी व्यक्तींच्या क्षमता उजेडात येतात. सत्ताधाऱ्यांना व्यापारी नगरांमधून खूप कर मिळतो याची चांगली जाणीव असते.