मुक्त मनाचा माणूस
(एखाद्या) माणसाच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझलेली नाही, याचा पुरावा काय? मुक्त मनाचा माणूस असे आपल्याला कोणाविषयी म्हणता येईल? आपल्या जागृत सदसद्विवेकबुद्धीद्वारे ज्याला आपले हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचे भान असते, त्याला मी मुक्त म्हणतो. जो परिस्थितीचा गुलाम न बनता, तिला बदलवून आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी तत्पर व कार्यरत असतो, त्याला मी मुक्त मानतो. जो निरर्थक रूढी, परंपरा व उत्सवांचा, अंधश्रद्धांचा गुलाम नाही, ज्याच्या मनात विवेकाची ज्योत तेवते आहे. त्याला मी मुक्त मानतो. ज्याने आपले इच्छास्वातंत्र्य गहाण ठेवले नाही; आपली बुद्धिमत्ता वस्वतंत्र विचारबुद्धी यांचा त्याग केला नाही, इतरांच्या शिकवणुकीनुसार जो आंधळेपणाने वागत नाही, वैधता व उपयुक्तता तपासल्याशिवाय व विश्लेषणाशिवाय जो कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही, आपल्या हकांच्या रक्षणासाठी जो सदैव सज्ज असतो, लोकनिंदा व अन्याय्य टीका यांची जो पत्रास बाळगत नाही, आपण इतरांच्या हातातील बाहुले बनू नये यासाठी आवश्यक विवेक व स्वाभिमान ज्याच्यापाशी आहे, त्यालाच मी मुक्त मानव मानतो.
विषय «उवाच»
विनाशाची क्षमता
आजच्या जीवशास्त्र्यांपैकी एक मोठा माणूस अटै मायर, याने काही वर्षांपूर्वी एक मत व्यक्त केले. तो पृथ्वी सोडून इतरत्र कुठे बुद्धिमान जीव सापडू शकतील का, यावर बोलत होता. त्याला असे जीव सापडण्याची शक्यता अगदी कमी आहे असे वाटत होते. उच्च बुद्धिमत्ता म्हणजे माणूसप्राण्यांत दिसते तश्या रचनेची बुद्धिमत्ता जीवांना कितपत परिस्थितीशी अनुरूप करते, यावर मायरचा युक्तिवाद बेतलेला होता. मायरच्या अंदाजात पृथ्वीवर सजीव रचना अवतरल्यापासून आजवर सुमारे पन्नास अब्ज जीवजाती उत्पन्न झाल्या आहेत; ज्यांपैकी एकाच जीवजातीपाशी संस्कृती घडवण्याला उपयुक्त अशी बुद्धिमत्ता आहे. या जीवजातीला ही बुद्धिमत्ता सुमारे एक लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली.
लोई ओबामा
काही आफ्रिकन देश दुर्मिळ धातूंची खनिजे इतर सर्व जगाला पुरवतात. आजचे प्रगत तंत्रज्ञान या धातूंशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे त्या धातूंच्या खनिजांना भरपूर मागणी असते. उदाहरणार्थ, पूर्व काँगो (पूर्वश्रमीचा झाईर) या देशात कथील, टंगस्टन आणि टैंटलम हे धात सापडतात, आणि हे तीन्ही धात मोबाईल फोन्स बनवण्याला आवश्यक असतात.
काही आफ्रिकन देशांत मध्यवर्ती सत्ता कमकुवत आहे, आणि वॉरलॉ ऊर्फ बाहुबली प्रत्यक्षात सत्ता गाजवतात. या सत्ता गाजवण्यात भाडोत्री सैनिक, आंतर जमातीय हेवेदावे, तस्करी, अशी अनेक अंगे असतात. अशा बाहुबलींचे पैशाचे स्रोत आटवण्याच्या हेतूने अमेरिकन काँग्रेसने (लोकसभेला समांतर, विधानसभा) डॉड-फ्रैंक वॉल स्ट्रीट सुधार कायदा (2010) मध्ये एक कलम घातले, की कोणत्याही अमेरिकन कंपनीने परदेशांतून माल विकत घेताना त्या खरेदीपासून स्थानिक बाहुबलीना मदत मिळू नये यासाठी काय खबरदारी घेतली ते सांगावे.
घराणी, चोरी, स्वातंत्र्य
पु.ल.: तुमचं घराणं या विषयावर काय मत आहे? भीमसेन : माझं स्वतःचं काय आहे, की मी डेमॉक्रॉटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आईवडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढं ठेवलं तर ती पोपटपंची होते. मग आपलं काही तरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे
. पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य वाटतं की, तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत तुम्ही जी रचना केलीत, त्याच्यामध्ये नवीनपण आहे.
थोडेसुद्धा ‘बहु’ आहे
“शेतकीतून मिळालेले थोडेसुद्धा ‘बहु’ आहे. कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी. त्यात नवीन कमाई नाही. द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही. परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हरएक कणात साक्षात् लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा निराळा, पैसा काय! चोरीने मिळतो, लुटीने मिळतो, सट्टेबाजीने मिळतो, लबाडीने मिळतो, तोंडपाटीलकीने मिळतो, दंडुक्याने मिळतो, राजाच्या शिक्क्याने मिळतो; आणि कशाने मिळत नाही? पण लक्ष्मींचा एक कणही मिळवण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंडपाटीलकीत नाही, कोणत्याही दांडगोबाच्या दंडुक्यात नाही किंवा कोणत्याही राजराजेश्वराच्या शिक्क्यात नाही.’
भाषा वाहते आहे !
भाषा वाहते आहे ! एका नदीच्या प्रवाहाच्या दोन काठांवर दोन माणसे उभी होती. पल्याडच्या काठावरील माणसानं ओरडून सांगितले, “भाषा वाहते आहे!” प्रवाहाच्या खळखळाटामुळे अल्याडच्या माणसाला काही नीट ऐकू आलं नाही. त्यानं हातवारे करून तसं सांगितलं. पल्याडच्या माणसानं पुन्हा ओरडून सांगितलं. अल्याडच्या माणसाला संदेश समजला. काठावरून मागे वळून त्यानं गावाकडे धाव ठोकली. गावकऱ्यांसाठी त्यानं हाकाटी पिटली, “धावा रे धावा ! भाषा वहावते आहे!”
शोधावें लागतें
‘आपल्या पूर्वजांच्या काळाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी असतात. एक अभिमानाची व दुसरी केवळ ऐतिहासिक किंवा विवेकाची. अभिमानाच्या दृष्टींत बऱ्यावाईटाचा विवेक नसतो; आणि कांहीं एका मर्यादेपर्यंत जुन्याचा अभिमान बाळगणें हें स्वाभाविकच नव्हे तर योग्यहि ठरतें. अभिमानाच्या दृष्टीला स्वकीयांच्या इतिहासरूपी पर्वतांचीं सर्वांत उंच शिखरें कर्तृत्वरूपी बर्फानें मढवलेलीं व कीर्तिरूपी उज्ज्वल सूर्यप्रकाशांत चमकणारी तेवढीच दिसतात. कारण अभिमान दुरून आणि केवळ कौतुकबुद्धीनें पाहणारा असतो. ऐतिहासिक किंवा चिकित्सक बुद्धि ही जवळ जाऊन शोधक बुद्धीनें पाहणारी असल्यामुळें तिला त्या पर्वतांच्या शरीरांचा खडबडीतपणा, त्यांतील खोल व भयंकर दऱ्याखोरीं, त्यांतील हिंस्र श्वापदें, विषारी वृक्ष, कांटेरी वेली, हें सर्व कांहीं दिसतें.
स्पेंग्लरच्या दृष्टान्ताचे भूत
एका वेगळ्या युगात ऑस्वॉल्ड स्पेंग्लरने वर्तवलेले भाकित प्रसिद्ध आहे. तो द डिक्लाइन ऑफ द वेस्ट मध्ये म्हणाला “व्यक्तिमाहात्म्य, उदारमत, लोकशाही, मानवतावाद आणि स्वातंत्र्य यांचे युग संपत आले आहे.” स्पेंग्लर नव्वदेक वर्षांपूर्वी लिहीत होता, पहिल्या महायुद्धानंतर, जर्मनीला अपमानकारक व्हर्सायच्या तहानंतर, आणि महामंदीच्या सुरुवातीच्या काळात. तो म्हणाला, ” (जनता) शरणागत भावाने बलवानांचा, सीझरांचा विजय मान्य करेल, आणि त्यांच्या आदेशांचे पालन करेल. जागतिक बाजारपेठा नव्या मंदीच्या तडाख्यात असताना आणि जुनी ‘शाश्वत’ मूल्ये खचली असताना स्पेंग्लरच्या दृष्टान्ताचे भूत परत आपल्याला पछाडणार आहे का? ” [ जॉन कँफनरच्या फ्रीडम फॉर सेल (Freedom For Sale, पॉकेट बुक्स, 2009) या पुस्तकातून.
लोकाभिमुख प्रगती
निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी. अमेरिकेत, युरोपात, जपानात पर्यावरणाच्या रक्षणाची पावले उचलली गेली, ती सारी लोकांच्या पुढाकारातून. ह्या पर्यावरणाच्या प्रेमातून जगभर दुसरीही एक चळवळ सुरू झाली. माहिती हक्काची. वेगवेगळ्या देशांत गेल्या काही दशकात माहिती हक्काचे कायदे पारित करून घेण्यात पर्यावरणवाद्यांनीच मुख्य भूमिका बजावलेली आहे.
ही माहिती हक्काची चळवळ लोकशाहीच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रगतीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.ही वाटचाल चालू आहे प्रातिनिधिक लोकशाहीकडून प्रत्यक्ष लोकशाहीच्या दिशेने. पुण्यात लोकमान्य टिळक गरजले होते; “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ हे लोकांचे स्वतःचे राज्य म्हणजे काही लोकप्रतिनिधींची मनमानी नाही.
अंधश्रद्धा विशेषांक – श्रद्धेची तपासणी
परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे. पण रूढ कर्मकांडांपलिकडे जाण्याचा आणि ‘कर्माचे डोळे चोख हो आवे’ या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आहे. श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून, संशोधनाने समोर ठेवलेल्या सत्याकडे जाताना मी कधी पाऊल मागे घेतले नाही.
[ रा.चिं. ढेरे यांनी पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणातून]