सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन
—————————————————————————इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपुर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा खास परिचय नंदा खरेंच्या शैलीत …
————————————————————————— ‘फक्त महाराष्ट्रालाच इतिहास आहे. इतर प्रांतांना केवळ भूगोल असतो’, हे अनेक महाराष्ट्रीयांचे मत अनिल अवचट आपल्या बिहारमधल्या ‘पूर्णिया’ जिल्ह्याबद्दलच्या पुस्तकात सुरुवातीलाच नोंदतात. नंतर मात्र गौतम बुद्ध बिहारमध्येच वावरून गेला हे आठवून महाराष्ट्रीय मत किती उथळ आहे हे अवचटांना जाणवले!