‘सूर्याच्या पहिल्या किरणांसवे, धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतर अजूनही दिमाखाने झळाळतो आहे. अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे. जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत ह्या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू. (अमेरिकन राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ)
एखाद्या देशाचे राष्ट्रगीत हे जणू त्याच्या इतिहासाचे प्रतिबिंबच असते. देशासाठी आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रगीतात केला जातो. राष्ट्रगीतांत जाणते- अजाणतेपणे ज्या घटकांचा उल्लेख केला जात नाही ते घटकही महत्त्वाचे असतात, नाही असे नाही.