‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे १८९६ पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालविले. त्यानंतर ९४ वर्षांनी आज सुरू होणाऱ्या ‘नव्या सुधारका’चा आगरकरांच्या ‘सुधारका’शी काय संबंध आहे? आणि नव्या सुधारका’चे प्रयोजन काय आहे? हे प्रश्न सुचणे स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे देण्याचा प्रथम प्रयत्न करतो.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘नवा सुधारक’ हा जुन्या ‘सुधारका’चा नवा अवतार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहात आहोत.