जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत झाला आहे, हे माझ्या प्रतिपादनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचे पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे.
नवे पर्व, नवे प्रश्न
नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरु झाले आणि सर्व काही वेगाने बदलले. त्यापूर्वी शहरीकरण, आधुनिकीकरण, शिक्षणाचा प्रसार इ. घटकांमुळे खेड्यांतील व शहरांतील वातावरण हळूहळू बदलत होते. स्त्रीमुक्तीचळवळ आकार घेत होती. बलात्कार, माध्यमांतून घडणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन, असे मुद्दे सार्वजनिक चर्चेत आणण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला होता.