३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही.