फलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे.
राजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे हे भाजपच्या एकूण विचारधारेशी सुसंगत तरी आहे. परंतु, वाजपेयी सरकारने २००१ साली विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे (UGC) सुरू केलेले फलज्योतिष अभ्यासक्रम २००४ ते २०१४ या काळातील UPA सरकारनेही बंद केले नाहीत. काँग्रेसचे आणि कम्युनिस्टांचे अनेक नेते उघडपणे ज्योतिष्यांकडे जात आणि जातात.