विषय «कविता»

बांध आणि हमीभाव

गावापासून दूर जंगलातल्या
वावराच्या धुऱ्यावर
वावरातला बारीक सारीक गोटा
वावर सप्फा करावा म्हणून
वावरातून वजा होत
जमा होत होत जातो
वावराच्याच बांधावर

गोट्यावर गोटा
एक्कावर एक करून
साल दरसाल
मिर्गाच्या तोंडी
ठेवत गेलं की
त्याचाच कंबरीएवढा बनतो बांध

कळत नकळत
गोट्यावर गोटा
रचलेल्या बांधाच्या भरोशावर
आम्ही काहीसे अस्तो बिनधास्त
कारण
थोडी का होईना
त्यामुळं रोखली जाते
जंगली जनावरांची अतिक्रमणं
दरसाल पाण्यासंग
वाहून जाणारी
वावरातील माती
राहते वावरात बांधामुळे टिकून
बांधाच्या या बांधणीमुळे
मोकाट जनावरं करत असलेलं
पिकांचं नुकसान
किमान नावापुरतं तरी
कमी होत असतेच.

पुढे वाचा

डिस्‌इन्फेक्टन्ट

कुठे मिळेल एखादा
महारेरा रजिस्टर्ड
मनाचा शांत कोपरा,
आठवणींची पथारी पसरायला?

अस्वस्थतेच्या काहिलीला
कुठे बसवून मिळेल
फाईव्ह स्टार इन्व्हर्टर एसी?
तितकाच गारवा वर्तमानाचा…!

कुठल्या वॉर्डमध्ये होतील
भीतीचे भुंगे सॅनिटाईज?
कुठल्या औषधात ही
गढूळ संध्याकाळ घालून प्यायली
की गोड लागेल?

विवंचना, काळजी इत्यादींचे
मास्क कोणत्या
मेडिकलमध्ये मिळतील?

सकारात्मकतेचे सर्जिकल ग्लोव्ह्स
घालून झोपले तर
नाकातोंडात जाणारी रात्र
जरा कमी होईल का माझी?

…माझं हे हल्ली असंच होतंय
कळत नाही नक्की

काय डिसीनफेक्टन्ट करायचंय ….शहर, संध्याकाळ की कवितेची वही …..

क – कवितेचा – ‘महाकवी’

शेतकरी 
पेरतो जमीन
चाड्यातून रुजवतो :
काळ्या भिन्न मातीवर पिकांची बीजं 

जसं शिकणार पोरगं लिहितं
काळ्या भिन्न पाटीवर अबकडई….

अन् मग
उगवून येते
मातीतून हिरव्यागार कणसांची कविता…. 

शेतकरी.. शेतकरी महाकवीच तर आहे!

घर आणि रात्र (कविता)

खरं तर,
ती कवी आहे
चित्रकार आहे…

तो ऑफिसला गेल्यानंतर
घर फक्त तिचं असतं;
मग ती जगते हवं तसं
तिला चित्र काढायला आवडतं;
ती चित्र काढते
दिवसभर खेळते रंगांशी…
गुणगुणते एखादं आवडीचं गाणं !
सायंकाळी तो घरी येतो,
आता ती गाणं गुणगुणत नाही,
ती मुकी होते
आणि…. आणि…
उडून जातो,
तिच्या कॅनव्हासवरून चेहऱ्यावर पसरलेला रंग !

तो घरी नसतो तेव्हाच फक्त;
घर तिचं असतं !
मग,
घर आणि रात्र दोन्ही त्याचं होतं !

चल कत्तली करूया

तुझं तू तिकडे अन् माझं मी इकडे
रोजचंच झालंय हे घुसमटणं
नको निभावूस दुनियादारी;
नाहीस तू अबला
अन् नाहीस रणरागिणी आणि दुर्गाही!
ह्या फसव्या शब्दावर फिरव तू हातोडा;
तू एक मुक्त जीव!
इथं रोजच तुझ्या पावित्र्याची घेतली जाईल अग्निपरीक्षा
कित्येक सीता ह्या अग्निकुंडात खपल्या
मर्यादा पुरुषाची जपत.
ठेवू नकोस आदर्श सावित्री, सीता अन् द्रौपदीचा.
नको देऊस संस्कृतीच्या गारद्यांपुढे तुझ्या भावनांचा बळी!
तू मुक्त हो, स्वाभिमानी हो!!
जिवंत ठेव तुझ्यातील ज्योतीची सावित्री!
मी नर अन् तू मादी
निसर्गाची हीच किमया !
जप रीत त्या निसर्गाची अन् दे झुगारून बंधने;
मी झुगारतो पुरुषपणाची कवचकुंडले!

पुढे वाचा

मंजूर नाही

सत्तर वर्षे उलटून गेलीत
मला स्वातंत्र्य मिळालंय
ते गिळायचा अधिकार
तुम्हांला कुणी दिला?

विज्ञानावर, विवेकावर
माझे मनापासून प्रेम आहे
त्याचा गेम करायचा अधिकार
तुम्हांला कुणी दिला?

माझा परिसर, माझी सृष्टी
माझे पाश आपुलकीचे
त्याचा नाश करण्याचा अधिकार
तुम्हांला कुणी दिला?

दीन, दुबळे, अपंग सारे
जोडण्याचा धर्म माझा
माणुसकीला तोडण्याचा अधिकार
तुम्हांला कुणी दिला?

मला झगडावे लागत आहे
मुतायच्या अधिकारासाठी
जनतेला सुतायचा अधिकार
तुम्हांला कुणी दिला?

माझ्या मनातले विचार
बोलायचा हक्क माझा
मला सोलायचा अधिकार
तुम्हांला कुणी दिला?

संविधानाने मला
शिकवले सन्मानाने जगणे
ते लाजिरवाणे होणे
मला मंजूर नाही

अजूनही येतोय वास फुलांना

नाहीतरी हवेवर उजेडावर स्वप्नांवर नियंत्रण थोडेच आलेले आहे
नाहीतरी शर्टाच्या खिशावर गुलाब लावून फिरता येते की घराबाहेर
नाहीतरी अजूनही सूर्य उगवतोच की नाही पूर्वेला पृथ्वीवर सकाळी सकाळी
नाहीतरी अजूनही न चुकता सकाळ संध्याकाळ होत राहतात की नाही दररोज
नाहीतरी अजूनही पुनवेला चंद्र फुलतोच की नाही आकाशात संपूर्ण
नाहीतरी पक्षी उडत राहतातच की नाही हवेत स्वतःच्या इच्छेने

मी म्हणतो विश्वास ठेवायला हरकत काय आहे
की आपण अजूनही जिवंत आहोत

नाहीतरी अजूनही दुःखाचा पूर थोडाच आला आहे घरभर
नाहीतरी पृथ्वी फिरतेच की सूर्याभोवती निरंतर
नाहीतरी सूर्यामुळे काळोख थोडाच गळतराहतो अंगावर
नाहीतरी उजेड सांडतच राहतो की सगळ्या पृथ्वीवर
नाहीतरीउजेडाने आपले डोळे थोडेच खुपत राहतात
नाहीतरी काळोखाने अजूनही डोळे थोडेच दिपत राहतात आपले

तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात
मी म्हणतो डोळे मिटून विश्वास ठेवायला
हरकत काय आहे
की अजूनही आपण मेलेले थोडेच आहोत

निरक्षर ईश्वर

जितक्या काही भाषा मी जाणतो
त्या सर्व मी आजमावून पाहिल्यात
ईश्वराला त्यातली एकही समजली नाही अद्याप

तो ना मान हलवत ना हुंकार भरत
वाटलं कदाचित देवदूतांकरवी तरी तो वाचून घेईल
चंद्राच्या पाटीवर कधी गालिबचा शेर लिहून ठेवला मी
तो धुवून टाकतो किंवा कुरतडून खाऊन तरी टाकतो 

शिकला सवरला असता जर आपला ईश्वर 
प्रेमाच्या गप्पागोष्टी नाही तरी  किमान
पत्रांची देवाण घेवाण तरी शक्य झाली असती

(हिंदीतूनअनुवादित)

विळा लावणारा जन्म

मांडवावर पसरलेली वेल
बुडापासून कापून घ्यावी विळ्यानं
सपकन
तसा
आईवडिलांच्या
मुलगा होण्याच्या प्रार्थनेला
विळा लावणारा तिचा जन्म
तिचा जन्म
तिच्या आईच्या स्तनांना
दुधाऐवजी भय फोडणारा …

ती जन्मली
अन् तिच्या आईच्या पाठीवर
मागच्या बाळंतपणातले
काळेनिळे वळ
पुन्हा जिवंत झाले

ती जन्मली
अन् कोपऱ्यात निपचित पडलेल्या
हिंस्र दुःखाने
पुन्हा डोळे उघडले …

पूर्वप्रसिद्धी : मीडिया वॉच  दिवाळी २०१६
संपर्क : ईमेल : vaibhav.rain@gmail.com

फेअर अँड लव्हली

फेअर अँड लव्हलीची वार्षिक विक्री आहे आठ हजार कोटी
कवितेच्या पुस्तकाच्या छापल्या जातात फक्त तीनशे प्रती

फेअर अँड लव्हली = गोरा रंग
गोरा रंग = सुंदर दिसणे
सुंदर दिसणे = स्त्री होणे

स्त्री जी कविता लिहिते
स्त्री जी कविता वाचते
ती या फॉर्म्युल्याच्या बाहेर आहे

कविता
जोडलेल्या असतात एकत्र मुंग्यांसारख्या
समाजाची रचना बदलण्यासाठी
फेअर अँड लव्हली
दाखवत असते अंगठा त्या श्रमाला !

– निर्मला गर्ग