१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर
तुला डॉलच बनून रहायचे असेल तर
पाठवत राहा शुभेच्छा
महिला दिनाच्या..
बस कुरवाळत
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला
तसेच, आयुष्यभर पुन्हा
सहन करण्यासाठी…
करत रहा अभिमान
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा
दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर
‘कशी तारेवरची कसरत करते’
हे ऐकून
तुझ्या मनावर कोरलेल्या
भूमिकेला न्याय देत
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या
पायावर सांभाळण्यासाठी…
टाकत राहा
मनगटात बांगड्यांचे थर
नेसत राहा
नवरात्रीच्या नऊ साड्या
करत रहा
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास
भरत रहा
टिकल्यांचा ठिपका
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या
स्वातंत्र्याच्या चंद्रावर
ग्रहणासारखा
तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….