आपण प्रत्येक घटनेचे कारण शोधतो. नको असलेल्या घटना टाळून हव्या असलेल्या घटना वारंवार घडविण्यासाठी ती पहिली पायरी आहे. घटनेच्या कारणशृंखलेतील आपल्या कुवतीचे दुवे शोधून त्यांवर नियंत्रण करण्याची आपली इच्छा असते. हे वर्णन विज्ञानाचे असले तरी उत्क्रांतीमुळे ते आपल्या स्वभावातच मुरले आहे.
अर्थात, उत्क्रांतीने मिळालेल्या इतर गुणांप्रमाणेच, कारण शोधण्याची कलासुद्धा अगदी प्राथमिक आहे. कुत्र्यांना अन्न देण्याच्या वेळेआधी इवान पावलॉव यांनी एक घंटानाद करण्याची सवय केली. रोज असा घंटानाद ऐकल्यानंतर निव्वळ घंटानाद ऐकूनच कुत्र्यांना लाळ सुटे. याचा अर्थ असा की सत्य सापडले नसले तरी वारंवार घडणाऱ्या काकतालीय न्यायावर (post hoc, ergo propter hoc) ठाम विश्वास ठेवण्याची सजीवांना सवय आहे.