गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठी चळवळ झाली आहे, अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रातील काही भागातील जनता जागरुकही झाली असेल. परंतु आजही काही आदिवासी समाजात कमालीची अंधश्रद्धा आहे. त्यापैकीच एक फासेपारधी समाज, या समाजामध्ये आजारपणात घरच्याघरी उपचार करण्याच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. हा लेख लिहायच्या आठ दिवसांआधी माझ्या पुतणीचा कान एका रात्री अचानक खूप दुखायला लागला, आणि ती वेदनेने तळमळून रडायला लागली. माझ्या आजोबांनी खूप वर्षांपूर्वी दिघाडा मादी (मोर) पक्षी मारला होता, त्याचा पाय माझ्या आज्जीने आताही जपून ठेवला आहे. तो पाय फल्ली तेलात कढवून सोनालीच्या, माझ्या पुतणीच्या कानात आणून फिरवला. काही वेळ तिला आराम वाटला पण नंतर रात्री दवाखान्यात डॉक्टरला दाखवावेच लागले. आज्जीनी कानदुखण्यावर वापरलेल्या या अनोख्या औषधी पद्धतीमुळे मी विचारात पडलो. आणि लगेच विचारलं, “आज्जी, दिघाडाचाच पाय तेलात कढवून कानामध्ये फिरवण्यामागचं कारण काय?” तर आज्जी म्हणाली, “दिघाडा हा पक्षी दिवसातून शंभरेकवेळा स्वत:चे कान खाजवत असतो असं आपल्या पूर्वजांचं शिकार करतानाचं निरीक्षण आहे. म्हणून कान दुखला की दिघाडाचा पाय फिरवण्याची पद्धत आपल्यामध्ये रूढ झाली आहे.”
परंपरेतून वापरात येणाऱ्या आजारावरच्या अशा हजारेक पद्धती प्रत्येक आदिवासी समुदायात असतील. त्या पूर्ण अंधश्रद्धा असतील, असं मला म्हणायचं नाही. परंतु साथीच्या आजारात अशा अंधश्रद्धा मानल्या गेल्यामुळे आदिवासी समाजाच्या कित्येक मुलांमुलींचा बळी गेला आहे. या घटनांचं गणित आपल्याकडे नाही. कोविडच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातल्या काही बेड्यांमध्ये एक-एक घुटी मोहाची दारू आणि नायनी वनस्पतीच्या पाल्याचा रस मुलामुलींना प्यायला दिला. नायनीच्या पाल्याची चव ही अतिशय कडू असून तो पाला जास्त खाण्यात आल्याने अनेक मुलांच्या जिवावर बेतू शकले असते. ही गोष्ट माझ्या आदिवासी समुदायातील बंधू-भगिनींनी लक्षात घ्यायला हवी.
गोवरसारख्या साथीच्या आजारात आदिवासी समुदायात उपचारासाठी वापरात येणाऱ्या अंधश्रद्धेमुळे कित्येक वर्षे आदिवासी समुदायाच्या मुलांच्या जिवासोबत खेळ खेळला जात आहे. देवी निघाली आहे म्हणून मुलामुलींना दवाखान्यात न दाखवता, गोवर निघालेल्या मुलांचा नदीमध्ये जाऊन उतारा काढायला लावणं, ज्या उताऱ्याचा कुठलाही फायदा आजारावर होत नाही, अशा अंधश्रद्धेला आदिवासी समुदायातील माणसं बळी पडतात. दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी मुख्य प्रवाहातल्या शहरापासून दूर वस्ती करून राहत असल्यामुळे मुलांचं लसीकरण प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे पिढ्यानुपिढ्या धार्मिक अंधश्रद्धा वापरात असल्याने आपलं सामाजिक आरोग्याचं स्वातंत्र्य गमावून बसलेल्या आदिवासी समुदायातील शिक्षित युवक-युवतींना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचं आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करण्याचं आवाहन या छोट्याशा लेखातून मी करत आहे.!!
Khup chhan lekh ahe.
सुंदर लेख आहे राठोड सर दलित आणि आदिवासी भागात जीवघेण्या अंधश्रद्धा आहेत . अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज तिथेच आहे . मात्र अंधश्रद्धेवर बोललो कि हिंदुत्ववादी चोप देतात .